मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
वृत्तसंस्था
भोपाळ
मध्य प्रदेशमध्ये मूग खरेदी, ई-टोकन प्रणाली आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू राहिले. याचदरम्यान शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडक सुरक्षेमुळे त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केल्याने शेतकऱ्यांनी भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन केले. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, पोलीस दलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन परिस्थिती शांत ठेवण्याचा आणि कोणताही संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री निवासस्थानाकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतक्रयांनी पोलिसांच्या बॅरिकेड्सचे तीन थर तोडले. आता ते शेवटचा बॅरिकेड तोडण्यासाठी पुढे सरकत आहेत. मध्य प्रदेशात 2,000 हून अधिक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 19 शेतकरी संघटनांचे शेतकरी मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. शेतकरी पायी चालत होते, त्यांच्यामागे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहने होती. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी एसएएफ, आरएएफ आणि 20 हून अधिक पोलीस ठाण्यांतील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अनेक अडथळे तोडून राज्याच्या राजधानीत घुसलेल्या शेतकऱ्यांनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली आहे.
शेतकऱ्यांनी भोपाळकडे मोर्चा काढल्याने ओबैदुल्लागंज ते भोपाळ महामार्ग बंद करण्यात आला, तर जबलपूरहून सुलतानपूरकडे जाणाऱ्या मार्गावरही परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे भोपाळला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी महामार्ग अडवण्याची आणि विधानसभेला घेराव घालण्याची धमकी दिली होती. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सात दिवसांचे शिधा आणि पाणी सोबत आणले असून, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते परत जाणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. 100 टक्के मूग खरेदीच्या मागणीसाठी शेतकरी भोपाळमध्ये दाखल झाले आहेत