पीक सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषीतर्फे ॲपची निर्मिती, शेतकऱ्यांकडून माहिती अपलोड
बेळगाव : खरीप हंगामातील ई-पीक सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 96 टक्के शेतकऱ्यांनी पीक सर्वेक्षण ॲपवर माहिती अपलोड केली आहे. त्यामुळे पीक सर्वेक्षण मोहीम यशस्वी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान कृषी विभागालाही दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण 14 लाख 71 हजार 444 क्षेत्रापैकी 14 लाख 20 हजार 573 क्षेत्राचे सर्वेक्षण झाले आहे. या सर्वेक्षणामुळे पीक, पिकांचे झालेले नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान याबाबतची माहिती उपलब्ध होते. खरीप हंगामातील मका, भात, भुईमूग, कापूस, कांदा आदी पिकांचे सर्वेक्षण झाले आहे. उर्वरित पिकांचे ई-पीक सर्वेक्षणही सुरू आहे. या अंतर्गत पिकांची छायाचित्रे घेऊन ॲपवर अपलोड केली जातात.
यासाठी फार्मर क्राफ्ट सर्व्हे या ॲपपची निर्मिती केली आहे. त्यामुळे कृषी खात्याला जिल्ह्यातील एकूण पिकांची स्थिती समजण्यास मदत होऊ लागली आहे. शेतकरी स्वत:च्या स्मार्ट मोबाईलवरून ई-पीक सर्वेक्षणासाठी माहिती अपलोड करू शकतात. ई-पीक सर्वेक्षण न झाल्यास शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई, पीक विमा, आधारभूत किंमत सुविधा, बँक कर्ज आणि इतर सुविधांपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे पिकांची माहिती अपलोड करणे गरजेचे आहे. सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी हे एक आहे. कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप जारी केला आहे. शेतकऱ्यांना पिकाचे सर्वेक्षण करण्यासाठी हा ॲप उपयुक्त आहे. यावर पिकाचा फोटो आणि इतर माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. कृषी खाते आणि महसूल विभागाने पीक सर्वेक्षणासाठी खासगी प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सर्वेक्षण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी अॅपद्वारे ई-पीक सर्वेक्षण करावे
फार्मर क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तसेच शेतीतील पीक आणि इतर गोष्टींची माहितीही उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलवरून ई-पीक सर्वेक्षण करावे. यासाठी अॅप असून त्यावर माहिती अपलोड करावी.
शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)