पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेलरोको आंदोलन
वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणातून दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता काही शेतकरी संघटनांनी पंजाबमध्येच रेलरोको आंदोलनास प्रारंभ केला आहे. बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गांवर ठाण मांडून वाहतूक विस्कळीत केली. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक अस्ताव्यस्त झाले असून अनेक तास प्रवाशांना खोळंबून राहावे लागले. बुधवारी दिवसभर ही परिस्थिती राहिली.
आंदोलनाचा कालावधी दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होता. या काळात शेकडो शेतकरी पंजाबमधील विविध रेल्वे मार्गांवर ठिय्या देऊन होते. दुपारी 3 वाजता आंदोलन संपल्यानंतर ते आपापल्या घरी गेले. त्यानंतर रेल्वेमार्ग मोकळे झाल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. तथापि, तो पर्यंत मोठा गोंधळ झाला होता.
समितीला भेटणार नाही
या आंदोलनाचे आयोजक आणि संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख नेते जगजीत सिंग डल्लेवाल हे गेले 23 दिवस शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करीत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी आणि मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीला आंदोलन नेते भेटणार नाहीत, अशी घोषणा डल्लेवाल यांनी केली. बुधवारी ही भेट आयोजित करण्यात आली होती. तथापि, अनेक कारणांच्या साठी ही भेट होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चेचा प्रारंभ केला आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला न भेटण्याचे एक कारण आंदोलकांकडून देण्यात आले आहे.
आंदोलन होतच राहणार
बुधवारचा रेलरोको केवळ 3 तासांचा असला तरी, हे आंदोलन पुढे होतच राहणार आहे, असे शेतकरी नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कृषी उत्पादनांना दिल्या जाणाऱ्या किमान आधारभूत दराला कायदेशीर आधार देण्यात यावा, ही शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, आंदोलकांवरील कारवाई मागे घ्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनांच्या आधारे किमान आधारभूत दर निर्धारित करावा, शेतमजूरांना किमान वेतन कायदा लागू करावा, इत्यादी अनेक मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.