थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या; १२ तासांनंतर तलावाबाहेर, तळ्याकाठीच मुक्काम
11:13 AM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
उमरगा: भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे शेतकरी आणि ऊस वाहतूकदार तब्बल १२ तासांनंतर जेकेकुर तलावाच्या पाण्याबाहेर आले. आमदार प्रवीण स्वामी आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने गुरुवारी दुपारपर्यंत थकीत ऊस बिलाची रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष पैसे मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांनी जेकेकुर तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. आपल्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलकांनी तब्बल १२ तास पाण्यात राहून प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर आमदार प्रवीण स्वामी आणि प्रशासनाने मध्यस्थी करत थकीत रक्कम गुरुवारी दुपारपर्यंत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक पाण्याबाहेर आले.
Advertisement
मात्र, आश्वासन मिळाल्यानंतरही आंदोलकांनी माघार घेतलेली नाही. त्यांनी तलावाच्या काठावरच मुक्काम करून ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. दिलेल्या मुदतीत थकीत ऊस बिलाची रक्कम मिळाली नाही, तर पुन्हा जलसमाधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांनी दिला आहे.
आता प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरते आणि शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisement
Advertisement
