Shaktipith Mahamarg | मत मागायला गावात येऊ देणार नाही! राधानगरीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
राधानगरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
राधानगरी (महेश तिरवडे ) - राधानगरी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील बारा गावांतील शेतकरी गुरुवारी राधानगरी तहसीलदार कार्यालयासमोर एकत्र आले. यावेळी शेतकऱ्यांनी शेकडो हरकती प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्याकडे सुपूर्द करत महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी केली.
तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात घोषणाबाजी केली. तसेच, या लढ्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, अन्यथा त्यांना भविष्यात कोणत्याही गावात मतदानासाठी येऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.प्रस्तावित महामार्गामुळे सुपीक शेती, घरे व जनजीवन उद्ध्वस्त होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी, शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या घरादारावर वरवंटा फिरवणारा प्रकल्प आहे. या महामार्गामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागतील. कोल्हापूर जिल्ह्यातील जनता हा महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा इशारा दिला.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, हिंदुराव चौगले, सदाशिव चरापले, फिरोजखान पाटील, जयसिंग पाटील, सुभाष पाटील, सुनील चौगले, धीरज डोंगळे, रघुनाथ कुंभार, कृष्णात पाटील, संग्राम पाटील, शरद पाडळकर यांच्यासह तालुक्यातील १२ गावांतील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.