मध्यवर्ती बसस्थानकासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या
ऊसदराच्या मागणीसाठी रास्ता रोको : बससेववर परिणाम, प्रवाशांची गैरसोय, शहरातील वाहतूक विस्कळीत
प्रतिनिधी/ बेळगाव
ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी राज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगावात प्रतिसाद मिळाला. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे बससेवा ठप्प होऊन बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र ऊसदराचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने कर्नाटक बंदची हाक दिली. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत आंदोलनाला पाठिंबा दिला.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावर ठिय्या मांडला. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने बसची वाहतूक रोखण्यात आली. परिणामी बसस्थानकातून होणारी बसची ये-जा बंद राहिली. अचानक बससेवा बंद झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. बसस्थानक परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत होते. ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने आंदोलनामुळे शहरातील जनजीवन व वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.