निजलिंगप्पा साखर संस्थेसमोर शेतकऱ्यांची धरणे
बेळगाव : ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनांची बैठक बोलावून या बैठकीला अधिकारीच गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांनी गणेशपूर रोडवरील निजलिंगप्पा साखर संस्थेसमोर निदर्शने केली. बुधवारी ही घटना घडली. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. या बैठकीत साखर आयुक्तही भाग घेणार होते. कित्तूर उत्सवानिमित्त जिल्हाधिकारी या बैठकीला येऊ शकले नाहीत. साखर आयुक्तांनीही बैठकीकडे पाठ फिरविल्यामुळे निजलिंगप्पा साखर संस्थेतील आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे धरले.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीच लक्ष पुरवत नाहीत. सात वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचीही पूर्तता नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाहीत तर कारखान्यांना ऊस गाळप करू देणार नाही, असा इशारा शेतकरी नेते बसनगौडा पाटील यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी धरणे धरलेल्या शेतकरी नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी ही बैठक ठरविली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नायकसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. धरणे कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर साखर संस्थेसमोर बंदोबस्त वाढविण्यात आला होता.