थ्री फेज वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा हेस्कॉम कार्यालयावर धडक मोर्चा, रास्ता रोको
वार्ताहर /किणये
वाघवडे-किणये परिसरात दिवसा शेतकऱ्यांना थ्री फेज विद्युत देण्यात येत नाही.शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे हेस्कॉमचे साफ दुर्लक्ष झाले आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीची दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी मच्छे विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक आम्हाला दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा देत नाहीत. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला. आम्ही रात्रीच्या वेळी कशा पद्धतीने पिकांना पाणी द्यायचे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना विचारल्या.
या मोर्चामध्ये रमाकांत कोंडुसकर, मनोहर किणेकर आदी मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. यामुळे मोर्चाला अधिक बळकटी मिळाली होती. शेतकऱ्यांनी प्रारंभी हेस्कॉम कार्यालयावर धडक मोर्चा काढला. व त्यानंतर रास्ता रोको आंदोलन केले. अन्नदाता हा शेतकरी आहे मग शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा का केला जात नाही, असा सवाल अनेक शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. मच्छे व किणये भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा विचारही हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थित करण्यात आल्या. यावेळी जी. ए. पी. एम. सी. सदस्य आर. के. पाटील, मनोहर किणेकर, राजू किणयेकर, आदी तालुक्यातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.