शेतकऱ्यांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडविणार
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे बैठकीत आश्वासन
बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी सुवर्णविधानसौधमध्ये झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत दिली. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजारी, नागय्यास्वामी देसाई आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्यांविषयी चर्चा केली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपयेप्रमाणे प्रोत्साहन धन दिले आहे. रोज 1 कोटी लिटर दूध खरेदी केले जात आहे. प्रत्येक लिटरला पाच रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत. भूसुधारणा कायद्यात याआधीच्या सरकारने केलेल्या दुरुस्ती मागे घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
पंपसेटना बारा तास निरंतर ज्योती वीजपुरवठा केला पाहिजे. अक्रमसक्रम योजना पुन्हा सुरू झाली पाहिजे. जंगली प्राण्यांकडून पीकहानी झाल्यास भरपाईची रक्कम वाढवावी. शेतकऱ्यांचे उत्पन्न खरेदीसाठी कार्पस फंड सुरू करावेत. पंचायतच्या धर्तीवर पशुवैद्यांची नेमणूक करावी, बेळगाव येथील साखर आयुक्तांच्या कार्यालयात आवश्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या शेतकरी नेत्यांनी केल्या. ऊस व मका उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांवर तोडगा काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला. शेतकऱ्यांना सात तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यास सरकार समर्थ आहे. वीज उत्पादन वाढविल्यानंतर पुरवठाही वाढविण्यात येणार आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. आपले सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.