जुना ट्रान्स्फॉर्मर बसविल्याने शेतकरी संतापले
वडगाव-येळ्ळूर शिवारातील प्रकार
बेळगाव : शहापूर-येळ्ळूर-अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शेतातील ट्रान्स्फॉर्मर वरचेवर निकामी होत असल्याने तो तात्काळ बदलावा, यासाठी हेस्कॉमला निवेदन देण्यात आले होते. परंतु, जुना ट्रान्स्फॉर्मर बसवून शेतकऱ्यांची बोळवण करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत असून दोन दिवसात नवीन ट्रान्स्फॉर्मर न बसविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिवारातील लोंबकळत्या वीजवाहिन्या, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर व कृषी कनेक्शनसाठी होणारा विलंब यासंदर्भात वडगाव, शहापूर, येळ्ळूर व अनगोळ शिवारातील शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध मागण्या केल्या होत्या. ट्रान्स्फॉर्मरवर वारंवार स्पार्क होत असून आग लागत आहे.
या ट्रान्स्फॉर्मवर वारंवार बिघाड होत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याने शेतकऱ्यांना बैलगाडीतून ट्रान्स्फॉर्मर शेतामधून बाहेर काढावा लागला होता. ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने या परिसरातील पिके सुकून जात आहेत. शनिवारी शेतकऱ्यांनी भेट घेतल्यानंतर सोमवारी सकाळी हेस्कॉमचे कर्मचारी दाखल झाले. परंतु, त्यांनी इतर ठिकाणचा जुना ट्रान्स्फॉर्मर या ठिकाणी बसवला. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. नव्या ट्रान्स्फॉर्मरची मागणी असताना जुना ट्रान्स्फॉर्मर बसविल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रान्स्फॉर्मरवरून वीजपुरवठा होणाऱ्या जोडण्या मागील काही वर्षात वाढल्या आहेत. त्यामुळे 25 ऐवजी 50 एचपी नवा ट्रान्स्फॉर्मर बसवावा. नवीन ट्रान्स्फॉर्मर न बसविल्यास बेळगाव तालुका रयत संघटनेतर्फे हेस्कॉमवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.