शेतकऱ्यांकडून महापंचायतीचे आयोजन
सर्व मागण्या मान्य करण्याची केंद्र आणि राज्य सरकारांकडे मागणी, डल्लेवाल यांचेही भाषण
वृत्तसंस्था / खनौरी
पंजाब आणि हरियाणाच्या सीमारेषेवर खनौरी येथे गेले चाळीस दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी किसान महापंचायतीचे आयोजन केले आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत महापंचायतीचा कार्यक्रम चालला होता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेले 40 दिवस प्राणांतिक उपोषण करत असलेले शेतकरी नेते रणजीतसिंग डल्लेवाल यांनीही या महापंचायतीला आपल्या शय्येवरुन संबोधित केले. मागण्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला. महापंचायतीला राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधून 50 हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते.
डल्लेवाल गेले 40 दिवस उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती क्षीण झाली आहे. तथापि, त्यांना महापंचायतीच्या स्थानी आणण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीसंबंधी दक्ष रहा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला, तर त्याचे उत्तरदायित्व पंजाब सरकारवरच असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे पंजाब सरकारने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या
कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीला कायदेशीर वैधत्व मिळावे, ही आंदोलक शेतकऱ्यांची सर्वात महत्वाची मागणी आहे. सध्या अशी कायदेशीर हमी नाही. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दराने कृषी उत्पादने खरेदी करतात. केंद्र किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांचे सर्व पीक विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना उत्पादने विकल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी किमान आधारभूत दराला कायदेशीर मान्यता मिळणे आवश्यक आहे, अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजनाही घोषित करावी अशीही मागणी आहे.
पंजाबचे केंद्र सरकारला साकडे
पंजाबच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारकडे साहाय्याची मागणी केली आहे. पंजाबच्या कृषी विभागाने या संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठविले असून सहकार्याची विनंती केली आहे. डल्लेवाल हे गेले 40 दिवस उपोषण करीत असून केंद्र सरकारने आपल्याशी चर्चा करावी, अशी त्यांची मागणी आहे. केंद्र सरकारने ही मागणी मान्य करावी आणि डल्लेवाल यांना उपोषणापासून परावृत्त करावे, असे पंजाब सरकारचे म्हणणे आहे. पंजाबचे कृषी मंत्री गुरुमितसिंग खुदियान यांच्या स्वाक्षरीने हे पत्र केंद्राला पाठविण्यात आले.
केंद्रीय कृषीमंत्र्यांना येण्याची विनंती
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी स्वत: आंदोलनस्थळी यावे आणि डल्लेवाल यांच्याशी चर्चा करावी, असे प्रतिपादन पंजाब सरकारने केले. चौहान यांनी या मागणीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. तसेच केंद्र सरकारनेही अद्याप पत्राला उत्तर पाठविलेले नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार केला जाईल, असे प्रतिपादन संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात चौहान यांनी केले होते.
खनौरी सीमारेषेवर आंदोलन
पंजाब आणि हरियाणाच्या खनौरी सीमारेषेवर होत असलेले हे आंदोलन गेला जवळपास दीड महिना होत आहे. हरियाणा सरकारने खनौरी सीमारेषा आपल्या बाजूने बंद केल्याने ते सीमारेषेच्या पंजाब बाजूला होत आहे. ही सीमारेषा ओलांडून दिल्लीकडे येण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न दोनवेळा असफल करण्यात आला. त्यामुळे आता खनौरी सीमारेषेवरच शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला सर्व शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेला नाही. तसेच अडत व्यापारी संघटनेनेही या आंदोलनाचा फारसा उपयोग होणार नाही, असे स्पष्ट करत आंदोलनापासून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला होता.
अपघातात महिला शेतकऱ्यांचा मृत्यू
पंजाबमधून खनौरी येथे महापंचायतीत भाग घेण्यासाठी जाणाच्या चार बसेसना अपघात झाल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. सध्या पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर धुके असल्याने वाहने चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे हा अपघात झाला, अशी माहिती पंजाब सरकारने दिली. या महिला भारतीय किसान संघटनेच्या कार्यकर्त्या होत्या अशी माहिती देण्यात आली आहे.
किसान पंचायतीला प्रतिसाद
ड किसान पंचायतीला प्रामुख्याने तीन राज्यांमधील शेतकऱ्यांचा प्रतिसाद
ड पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकरी पंचायतील सहभागी
ड शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या त्वरित मान्य करण्याची आंदोलकांची मागणी
ड कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत दराला कायदेशीर हमीची मागणी