For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकरी संघटनेचे हलगा-मच्छे बायपासवरच आंदोलन

12:58 PM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
शेतकरी संघटनेचे हलगा मच्छे बायपासवरच आंदोलन
Advertisement

उसाला आधारभूत किंमत देण्यासोबत विविध मागण्या : शेतीसाठी दिवसा बारा तास थ्री फेज विद्युतपुरवठा करा : शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्जमाफ करा

Advertisement

बेळगाव : उसाला आधारभूत किंमत देण्यात यावी, बेळगाव येथील साखर आयुक्त कार्यालयासाठी स्वतंत्र आयुक्तांची नेमणूक करण्यात यावी, दुधाच्या दरात वाढ करावी, तसेच प्रत्येक जिल्ह्यात मका आणि बाजरी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी गुरुवारी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना (हसिरू सेने) च्यावतीने आंदोलन करण्यात आले. हलगा-मच्छे बायपासवर तंबू ठोकत शेतकऱ्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगावसह विजापूर, बागलकोट, धारवाड जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

जमीन सुधारणा कायदा रद्द करावा, कृषी विभागातील रिक्त पदे त्वरित भरली जावीत, कित्तूर तालुक्यातील कुल्लोळी गावातील जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून द्यावी, साखर कारखान्यांमध्ये डिजिटल वजनकाटे सुरू करून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, शेतीसाठी दिवसा बारा तास थ्री फेज विद्युतपुरवठा करावा, शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी करावी, यासह इतर मागण्या करण्यात आल्या. राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागीलवर्षीच्या दुष्काळाची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भरपाई त्वरित शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रकाश नायक, राजू पवार, शिवानंद मुगळीहाळ यांच्यासह इतर शेतकरी नेते उपस्थित होते.

Advertisement

चाबूक मोर्चाने वेधले लक्ष

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आसपासच्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी हलगा-मच्छे बायपास परिसरात जमा झाले होते. यावेळी शेतकऱ्यांचा नेहमीच सरकारवर वचक राहिला आहे, हे दाखवून देण्यासाठी काही शेतकरी चाबूक घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

कृषीमंत्र्यांची शेतकऱ्यांशी चर्चा...

हलगा-मच्छे बायपास रोडवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी कृषीमंत्री शिवानंद पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची चर्चा घडवून आणू, असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाही गेले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

Advertisement
Tags :

.