हलगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा विरोध कायम
बायपास रस्ता रद्द करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रोडमध्ये 153 हून अधिक एकर सुपीक शेती संपादित करण्यात आली. परंतु पहिल्या दिवसांपासून शेतकऱ्यांचा बायपास रोडच्या कामाला विरोध आहे. मंगळवारी पालकमंत्र्यांच्यासमोर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हलगा-मच्छे बायपास रद्द करावा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे जिल्हा प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून आले. मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हलगा-मच्छे बायपास संदर्भात शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, आमदार राजू सेठ, बुडा चेअरमन लक्ष्मण चिंगळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या बाजूने अॅड. भरत जाधव यांनी माहिती दिली. 14 वर्षांपासून हलगा-मच्छे बायपास रोड रद्द करावा यासाठीचा लढा सुरू आहे. बेळगाव--खानापूर रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात हलगापासून मच्छेपर्यंत रस्ता करण्यासाठी अधीसूचना काढण्यात आली. शेतकऱ्यांनी महामार्गाला हरकती नोंदवूनदेखील याचा पुढे कुठेच विचार झाला नाही. हलगा-मच्छे बायपासपासून काही अंतरावरच रिंगरोड होत असल्यामुळे बायपासची गरज काय? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
पैसे नकोत बायपास रद्द करा
जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली याची माहिती देण्यास सुरुवात केली. याला शेतकऱ्यांनी विरोध करत पैसे नकोत बायपास रस्ता रद्द करा, अशी मागणी केली. महामार्गाची अधीसूचना काढतानाही चुकीच्या पद्धतीने झिरो पॉईंट सेट केल्याची तक्रार रमाकांत कोंडुसकर यांनी केली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन दिले. यावेळी प्रकाश नाईक, राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांसोबत करणार चर्चा
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शेतकरी तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. हलगा-मच्छे बायपास मागील अनेक वर्षांपासून रखडला असल्याने तो नको असेल तर यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे काय?
हलगा-मच्छे बायपासचा झिरो पॉईंट निश्चित करण्याबरोबरच इतर प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांना विचारले. यावेळी त्यांनी नियमावलीनुसारच बायपासचे काम सुरू असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात 127 एकर पैकी 77 एकरमधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात 20 पैकी 10 एकरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रांताधिकारी बलाराम चव्हाण यांनी सांगितले.