विमा कंपनीकडून वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक
माजी उपसभापती प्रफुल्ल उर्फ बाळू परब यांचा आरोप : न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी
वेंगुर्ले
हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत रिलायन्स कंपनीकडून वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील पाचही सर्कलमध्ये तापमानाच्या चुकीच्या नोंदी घेऊन नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तालुक्यात सरसकट हेक्टरी ५६ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रफुल्ल उर्फ बाळू परब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.गतवर्षीच्या हंगामात सततच्या वाढत्या तापमानामुळे येथील आंबा व काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज केले आहेत ते योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल यां आशेवर होते. मात्र विमा कंपनीकडून मंजूर झालेली नुकसान भरपाई अत्यंत कमी आहे. कंपनीने स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याला हव्या तशा तापमानाच्या नोंदी मॅनेज करून गरीब शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. सध्या मंजूर असलेली नुकसानभरपाई म्हापण सर्कलला हेक्टरी ७००० रुपये, शिरोडा सर्कलला हेक्टरी २१,१००, वेंगुर्ले सर्कलला हेक्टरी २८,२००, मातोंड सर्कलला २१,१०० तर वेतोरे सर्कलला हेक्टरी केवळ ६ हजार रुपये एवढी तुटपुंजी मिळणार आहे रिलायन्स कंपनीकडून ही एक प्रकारची फसवणूकच आहे. एकाच तालुक्यात ३ ते पाच किलोमीटर अंतरावर एवढी मोठी तफावत असल्याने यात घोळ दिसून येत आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण तालुक्यात सरसकट हेक्टरी ५६ हजार रुपये एवढी नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.