ऊस तोडी थांबवण्यासाठी वारणा परिसरात 'स्वाभिमानी'च्या मोटर सायकल रॅली
रविवारच्या चक्का जाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
वारणानगर / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नये तसेच दि.१९ रोजी रविवारच्या चक्का जाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा परिसरातील गावातून मोटर सायकल रॅलीने केले.
पेठवडगांव ता. हातकणंगले येथील छत्रपती चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरवात झालेल्या
मोटरसायकल रॅलीची सांगता पन्हाळा तालुक्यतील सातवे- सावर्डे येथे झाली. या रॅलीमध्ये सुमारे दीडशे मोटर सायकल सहभागी झाल्या होत्या. वडगाव भादोले, किणी, घुणकी, तळसंदे, पारगाव, कोडोली, काखे, मोहरे, मार्गे सातवे येथे रॅली आली असता शिवाजी चौक सातवे येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
वारणा परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नये ज्यांना आंदोलनात सहभागी होता येत नसेल तर त्यांनी ऊस तोडी न घेता आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे रॅलीला संबोधित करताना केले.गेले एक ते दीड महिन्यापासून साखर कारखानदारांना निवेदन,खर्डा भाकर, ढोल वाजवणे या सर्व गोष्टी करून देखील कारखानदार दरासंदर्भात काही बोलत नाही त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नये असे आव्हान हातकणंगले तालुका अध्यक्ष आप्पा एडके यानी केले.
यावेळी संपत पवार,अजित पाटील, विजय सावंत, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे पन्हाळा अध्यक्ष प्रणव निकम,भाऊसो निकम, सौरभ पाटील, बळी चव्हाण, आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.