हिंडलगा कारागृहासमोर शेतकऱ्यांचे ‘जेलभरो’
बेळगाव, खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग
वार्ताहर/ हिंडलगा :
राज्य शेतकरी संघटना व हसिरू सेनेच्या वतीने उसाला योग्य दर मिळावा यासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देऊन सोमवार, दि. 2 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बेळगाव व खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करत जेलभरोसाठी आंदोलन छेडले. त्यानंतरही सायंकाळपर्यंत घोषणाबाजी करत गटागटाने कारागृहाच्या दिशेने येत होते. यावेळी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना अडविण्यात आले.
कर्नाटक सरकारने एसएपी दर वाढवावा, तर केंद्र सरकारने एमएसपी दर वाढवून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. 5,500 रु. दर मिळाला पाहिजे ही मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश या राज्यांतून उसाला योग्य दर मिळतो तर कर्नाटकात का नाही? अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली होती. बेळगाव तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष रामनगौडा पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनात हिरेबागेवाडी, खानापूर, हल्याळ, एम.के. हुबळी व बेळगाव भागातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
या आंदोलनात गोकाक, रायबाग, हुक्केरी या भागातील 20,000 शेतकरी उद्यापर्यंत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.गुर्लापूर भागातील शेतकरी जेलभरो आंदोलनासाठी निघाले असल्याची माहिती या नेत्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंडलगा कारागृहाबाहेर आणि संबंधित मार्गावर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
