पश्चिम भागातील शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाची चिंता
कापणी, बांधणी, मळणी, पेरणी कामात शेतकरी व्यस्त
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागामध्ये सध्या शेतकरी वर्ग कापणी, बांधणी, मळणी आणि पेरणी कामात व्यस्त आहे. वर्षभराच्या कष्टाचे धान्य घरी येईतोपर्यंत त्याला समाधान नसते. मात्र सध्या ढगाळ वातावरण, जोरदार वारा या साऱ्या भीतीचे सावट त्याच्या पाठीशी कायम असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. चालूवषीचा एकंदरीत हंगाम पाहिला तर शेती व्यवसाय म्हणजे एक जुगार झाल्याचे शेतकरी वर्गातूनच बोलले जात आहे. सातत्याने पडणारा पाऊस, थंड, गरम असलेले वातावरण यामुळे खरीप हंगामातील बटाटा, भुईमूग, मिरची, नाचणा, बाजरी, मका, रताळी व इतर भाजीपाला या सर्वच पिकांनी जवळपास या भागात दगा दिला आहे. भातपीक चांगले असल्याने शेतकरी थोडा सुखावला होता. मात्र सध्या कापणीच्या काळातच ऐन हंगामाला सुऊवात केली आणि पुन्हा एकदा पावसाळी वातावरणामुळे तो भयभीत झाला आहे. या भागात सध्या भात कापणीला जोर आला असून कापणीनंतर लागलीच त्याची बांधणी करणे हेही तितकेच गरजेचे आहे. कापणीनंतर पाऊस झालाच तर या भातपिकाचे मोठे नुकसान होणार. यासाठी बांधणीही करण्यात येत आहे. छोट्या मोठ्या मळण्या या भागात सध्या सुरू असून केव्हा एकदा हे भाताचे दाणे, भातपीक घरी घेऊन येतो, असे त्याला झाले आहे.