For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसामुळे शेतकरी अडचणीत

10:23 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
पावसामुळे शेतकरी अडचणीत
Advertisement

दुहेरी संकटाने शेतकरी मेटाकुटीला : पीकही वाया जाण्याची भीती

Advertisement

बेळगाव : अवकाळी पावसाचा शिडकावा शुक्रवारी रात्री काही भागामध्ये झाला. तर काही भागात जोरदार सरी देखील कोसळल्या. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. काही भागामध्ये भात कापणी सुरू आहे तर काही भागामध्ये मळण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला असून हातातोंडाला आलेले थोडे पीकही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या थंडीचा मोसम सुरू आहे. मात्र मध्यंतरी काही दिवसच थंडीला सुरूवात झाल्याची चाहूल लागली. मात्र त्यानंतर पुन्हा दररोज ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा होत आहे. शुक्रवारी ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचा काही ठिकाणी जोरदार मारा झाला. काही ठिकाणी केवळ शिडकावा झाला आहे.

पावसामुळे मळण्या लांबणीवर

Advertisement

सध्या शेतकरी भात कापणी आणि मळणीच्या कामामध्ये गुंतले आहेत. मात्र पावसामुळे त्या मळण्या थांबवाव्या लागल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी भात कापणी करून ठेवली आहे. त्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. काही भागामध्ये ओलावा असलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी कडधान्य पेरणी केली. त्यालाही फटका बसला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पाऊस आला अन् गेला तरीही नुकसानच

आता पाण्याची टंचाईही निर्माण होताना दिसत आहे. विविध पिकांसाठी पाणी देताना समस्या निर्माण झाली आहे. विहिरींना तसेच कूपनलिकांना पाणी कमी झाले आहे. त्यामुळे जानेवारीनंतरच पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. पाऊस आला तरी नुकसान आहे आणि पावसाने दडी मारली तरी नुकसान आहे. एकुणच शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

ढगाळ वातावरणाने सुगी हंगाम खोळंबला

मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे. त्यामुळे सुगी हंगाम खोळंबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी घाईगडबडीने सुगी हंगाम साधला असला तरी ढगाळ वातावरणामुळे कामात व्यत्यय निर्माण होऊ लागला आहे. यंदा पावसाअभावी भात, रताळी, भुईमूग, बटाटे, सोयाबीन आदी पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. उरली सुरली पिके पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र मागील चार दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने सुगी हंगामात अडथळा निर्माण झाला आहे. आधीच पावसाअभावी भात शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यातच काही ठिकाणी कापणी केलेल्या भातावर पाऊस पडला आहे. त्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. खरीप हंगामात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके करपून सुकून गेली. कडधान्य पेरणीसाठीही ओल कमी असल्याने पेरलेले कडधान्य उगेल की नाही याचीच चिंता सतावत आहे. आधीच पावसाअभावी बरेच नुकसान झाले आहे. त्यातच आता वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी उघडीपीची वाट पाहात   आहेत.

Advertisement
Tags :

.