Solapur News | सोलापुरात शेतकरी आंदोलन विकोपाला! गोकुळ कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे थेट तलावात 'जलसमाधी' आंदोलन
सोलापूर : दहिटणे येथील गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी शेतकरी गेल्या १७ दिवसांपासून सोलापूरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. मात्र, अद्यापही मागण्यांची दखल न घेतल्याचा आरोप करत आज आंदोलक शेतकऱ्यांनी थेट छत्रपती संभाजी महाराज तलाव गाठत जलसमाधी आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी तलावात उतरले. कारखाना व्यवस्थापन आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी, “आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतोय, भीक नाही,” असा सवाल उपस्थित करत तलावात उड्या घेतल्या. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही अधिकारी स्वतः तलावात उतरून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याचे दिसून आले.
दरम्यान, दक्षिण सोलापूरचे प्रांताधिकारी सुमित शिंदे आणि दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार किरण जमदाडे यांनीही तलावात उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले.
यापूर्वी आंदोलकांना तलावाकडे जाण्यापासून रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता. मात्र, शेतकऱ्यांनी पोलिसांचा सुरक्षा घेरा तोडून तलावाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक वादावादीही झाली.
सध्या प्रशासनाकडून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शेतकरी मात्र थकीत ऊस बिल मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेत आहेत.