For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Updates पावसाची ओढ, मोकाट जनावरांचा उपद्रव पिकांचे मोठे नुकसान; कुंभरोशी–हरोशी परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात

09:50 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara updates पावसाची ओढ  मोकाट जनावरांचा उपद्रव पिकांचे मोठे नुकसान  कुंभरोशी–हरोशी परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात
Advertisement

ता. भा. वार्ताहर

Advertisement

प्रतापगड : महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी, जावली व हरोशी परिसरातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. पावसाच्या अनियमिततेसोबतच मोकाट जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे पावसाने अपेक्षित साथ दिलेली नसताना दुसरीकडे पेरलेल्या व नुकत्याच उगवलेल्या पिकांवर मोकाट गाई-गुरे ताव मारत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

यंदा पावसाचा जोर कमी असल्याने शेतीची कामे अडचणीत आली आहेत. पावसाच्या भरवशावर असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी भात, नाचणी, वरी तसेच इतर खरीप पिकांची पेरणी केली आहे. काही ठिकाणी पिके उगवण्यास सुरुवात झाली असतानाच मोकाट गाई-गुरांनी शेतांमध्ये घुसून कोवळ्या पिकांची नासधूस सुरू केली आहे. त्यामुळे अगोदरच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे.

Advertisement

कुंभरोशी : मोकाट जनावरांकडून पिकांचे होत असलेले नुकसान.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिवसा आणि रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे शेतांमध्ये मुक्तपणे वावरत असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. अनेकांना आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रभर शेतात जागरण करावे लागत आहे. शेतीची कामे, हवामानाची चिंता आणि पिकांचे रक्षण यामध्ये शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.

संबंधित जनावरांच्या मालकांनी जबाबदारीने वागून आपली जनावरे बांधून ठेवावीत व त्यांची योग्य देखभाल करावी, अशी मागणी होत आहे. काही जणांकडून जनावरे मोकाट सोडली जात असल्याने त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अन्यथा पिकांचे नुकसान वाढून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. आधीच पावसाच्या अनिश्चिततेमुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे.

पावसाची ओढ आणि मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव यामुळे कुंभरोशी, जावली व हरोशी परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले असून पिकांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.