कडोली भागात पावसामुळे बटाटे बियाणे कुजून गेल्याने शेतकरीवर्ग संकटात
वार्ताहर/कडोली
संततधारपणे कोसळत असलेल्या पावसामुळे कडोली परिसरातील भात रोपासह लागवड केलेले बटाटे बियाणे कुजून गेल्याने शेतकरी संकटात सापडला असून भात रोपासाठी दुबार पेरणी करण्यात आली आहे. गेल्या उन्हाळी हंगामापासून ते पावसाळी हंगामापर्यंत कडोली परिसरातील शेती व्यवसाय कोंडीत सापडला आहे. यामुळे शेतकरीवर्गाला मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संपूर्ण उन्हाळी हंगामात कोणत्याही पिकाला योग्य दर मिळत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी उभा पिकावर रोटावेटर फिरविला. या हंगामात मोठा आर्थिक तोटा झाला.
त्यानंतर आता पावसाळी हंगाम सतत सुरू असलेल्या पावसाने शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांची भातरोपे कुजून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. लागवडीसाठी भात रोपांची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा भातरोपासाठी पेरणी केली आहे. त्यामुळे रोप लागवडीची कामे महिना ते दोन महिने लांबणार आहेत. ज्यांची भात रोपे पाण्याखाली सापडली नाहीत त्या शेतकऱ्यांनी इतर कामे हाती घेतली आहेत. मात्र उशीरा पेरणी केलेल्या भातरोपांची लागवड लांबणार आहे.
बटाटे लागवडीत यावर्षी 75 टक्क्यांनी घट
संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात बटाटे उत्पादनात अग्रेसर असलेला कडोली परिसर आता यावर्षी बटाटे बियाणे लागवडीत पिछाडीवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कडोली परिसरात यावर्षी बटाटे लागवडीत 75 टक्क्यांनी घट झाली असून केवळ 25 टक्के शिवारात बटाटे लागवड करण्यात आली आहेत. परंतु यावेळी संततधार पावसामुळे याही बटाटे पिकांवर संकट आले आहे. पाण्याचे प्रमाण अधिक होवून निम्मे बटाटे बियाणे कुजून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे बटाटे पीक न केलेले बरे, अशी शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. यावर्षी बहुतांशी शेतकऱ्यांनी बटाटे पिकाचा नाद सोडून रताळी पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी रताळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली दिसून येत आहे. एकंदरीत संततधार पावसाचा फटका बसल्याने कडोली परिसरातील शेतकऱ्यांत नाराजी दिसून येत आहे.