कोकणात ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे
2025 मध्ये पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. त्यामध्ये मराठवाड्यात मोठी पुरस्थिती निर्माण होऊन घरे, दारे, शेती वाहून गेल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. अशी स्थिती कोकणात निर्माण झाली नसली, तरी पावसाळी हंगाम संपल्यानंतर अवकाळी पावसाने मोठे संकट कोसळले आहे. उभे भातपिक आडवे पडून जमिनीवरच कुजण्याच्या अवस्थेत आहे. कोंब फुटल्याने धान्य निरुपयोगी ठरत आहे. या अवकाळी पावसाने कोकणातील शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळ सदृश परिस्थिती व अवकाळी पावसामुळे मासेमारी आणि पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने कोकणसाठी पॅकेज नाही, पण कोकणातील शेतकरी, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांसाठी भरीव नुकसान भरपाई मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे.
कोकणात यावर्षी सलग पाच महिन्यांहून अधिक काळ पाऊस पडत आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या ऋतुचक्रात कमालीचे बदल होऊ लागले आहेत. चार महिन्यांचा असलेला पावसाळा यंदा पाचपेक्षा अधिक महिन्यांचा झाला आहे. कधी कधी तर पाऊस वर्षभर अधूनमधून पडतच असतो. त्यामुळे या ऋतुचक्राच्या बदलाने शेतकरी मात्र वारंवार संकटात सापडत आहे. यावर्षी 15 मेपासून पावसाला सुरुवात झाली आणि 13 ऑक्टोबर रोजी मान्सून परतला आणि थोडीशी उघडीप मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली. मात्र पावसाळी हंगाम संपतो न संपतो तोच अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे यावर्षी पावसाने पिच्छाच सोडला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे भातपिक उत्पादक, पर्यटन व्यावसायिकांना मोठा फटका बसून कोकणच्या अर्थकारणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. त्यानंतर जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. मात्र यावर्षी मे महिन्याच्या 15 तारखेपासूनच म्हणजेच दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आणि भात पेरणी लवकर झाली. परंतु अतिवृष्टी झाल्याने पावसाचा फटका भात पेरणीलाही बसला. पेरणी केलेले अर्धेअधिक भात उगवलेच नाही. भात पेरणी आणि लागवड क्षेत्रातही घट झाली. त्यानंतर मात्र पावसाचे सातत्य होते. भात शेतीसाठी ते पूरक असल्याने यावर्षी पिकही चांगले आले होते. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला होता. परंतु गणेशोत्सवानंतर कोकणात पुन्हा अतिवृष्टी होऊन धो-धो पाऊस पडल्याने फुलोऱ्यावर पाऊस पडून भात निरुपयोगी होण्याचे प्रमाणही वाढले. तरीही शेतकरी वर्ग पावसाळी हंगाम संपताच उरले-सुरले तयार झालेले भात कापणीसाठी तयारी करीत होता. असे असतानाच पावसाळी हंगाम संपूनही अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.
यावर्षीचा पावसाळी हंगाम 13 ऑक्टोबर रोजी संपला. मान्सून परतल्याचे हवामान खात्याकडून जाहीर झाल्यानंतर पावसाने उघडीप घेतली आणि शेतकऱ्यांनी भात कापणीस सुरुवात केली होती. मात्र अरबी समुद्रातील न्यून दाबाचे क्षेत्र तसेच कर्नाटकाच्या अंतर्गत भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वादळी सदृश अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे हातातोंडाशी आलेले उभे पीक आडवे झाले आणि शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला जाऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कापणी केलेले भात वाफ्यामध्ये पाणी साचल्याने तरंगू लागले. अनेक ठिकाणी पिकलेल्या भाताच्या लोंब्या पाण्यात राहिल्याने भाताला पुन्हा कोंब आले. काही ठिकाणी भातपिक कुजले. त्यामुळे शेतकरी बळीराजा हवालदील झाला. यावर्षी सततचा पाऊस पडून उरली-सुरली भातशेती तयार झाल्यानंतर ती तरी आपल्याला मिळेल, या आशेने शेतकरी राजा पाऊस जाण्याची वाट पाहत होता. मात्र अवकाळी पाऊससुद्धा एक-दोन दिवस नव्हे, तर सलग आठ दिवस या पावसाने धुमाकुळ घातल्याने उरले-सुरले भातपिकही शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे.
अवकाळी पावसामुळे भातपिक कुजल्याने शेतकऱ्यांची अधिकच कोंडी झाली आहे. कारण पावसाळ्यामधील खरीप हंगामाचे भातपिक तयार झाल्यानंतर तयार भाताचे बियाणे रब्बी हंगामासाठी वापरले जाते. परंतु खरीप हंगामातील भातपिकच जर राहिले नाही, कुजून गेले, तर रब्बी हंगामाला भातबियाणे कुठून मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे यावर्षीचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या सणामध्ये सुरु झालेल्या या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी वर्ग सातत्याने मागणी करीत आहे. परंतु दिवाळी सणाच्या सलग सुट्ट्यांमुळे पंचनामे करणारे कर्मचारीच जाग्यावर नसल्याने पंचनामे सुद्धा होऊ शकलेले नाहीत. निदान आतातरी दिवाळी सुट्टीनंतर पंचनामे करावेत किंवा शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
खरं तर यावर्षीचा पावसाळी हंगाम पाहिल्यास चार महिन्यांपेक्षा अधिक काळ राहिला आणि पावसाळी हंगाम संपूनही अवकाळी पाऊस सुरु राहिला. त्यामुळे कोकणात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने याची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. परंतु मराठवाड्यासारख्या भागात मोठी पूरस्थिती निर्माण होऊनही शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शासन कोकणातही ओला दुष्काळ जाहीर करेल, एवढे उदार होणार नाही. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ नको किंवा स्वतंत्र पॅकेजही नको. निदान शासनाने कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट शेती नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शासनाने विचार करणे आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट दूर होऊन दिलासा मिळेल. अन्यथा आगामी रब्बी हंगामात भातबियाणे तर मिळणारच नाही आणि खरीप हंगामाचीही चिंता लागून राहणार आहे.
यावर्षी अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले. त्याबरोबरच मासेमारी आणि पर्यटन हंगामालाही मोठा फटका बसला आहे. दिवाळीच्या ऐन पर्यटन हंगामात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे पर्यटन व्यवसायाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. वारा आणि पावसामुळे समुद्रातील जल पर्यटन व्यवसाय थंडावला असून मासेमारीही ठप्प झाली आहे. मच्छीमार बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत. मासळीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांना बसलेला हा फटका पाहता शासनाने त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे.
पावसाळी हंगाम हा चार महिन्यांचा असतो. सप्टेंबर महिना अखेरीस पावसाळी हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण येतो. या दिवाळीच्या सणामध्ये शाळांना सुट्ट्या पडल्यावर पर्यटनासाठी लोक बाहेर पडत असतात आणि गेल्या काही वर्षांपासून पाहिल्यास कोकणला पर्यटक अधिक पसंती देत आहेत. कोकणातील स्वच्छ समुद्रकिनारे आणि जलपर्यटन यामुळे पर्यटक अधिक आकर्षित होऊ लागले आहेत. त्याप्रमाणे यावर्षी दिवाळीचा सण सुरू होताच सुरुवातीचे एक दोन दिवस कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक आनंदीत होते. मात्र त्यांचा आनंद अळवावरील पाण्यासारखाच ठरला. अवकाळी पावसाने घात केला. संपूर्ण किनारपट्टी त्यामुळे सुनी-सुनी झाली. जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी, समुद्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला. तसेच कोकणातील प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. परंतु, वादळी परिस्थितीमुळे किल्ल्यावर जाणारी होडी सेवासुद्धा बंद ठेवावी लागली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या हंगामात पर्यटन व्यवसाय बहरण्याऐवजी थंडावला. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. त्याचबरोबर वादळी परिस्थितीमुळे मच्छीमार गेल्या चार दिवसांपासून समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकलेले नाहीत. समुद्र किनाऱ्यावर बोटी सुरक्षित उभ्या केल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनाही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. म्हणूनच अवकाळी पावसामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीबरोबरच मासेमारी आणि पर्यटन व्यवसायाला बसलेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. तरच कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभे राहतील.
संदीप गावडे