For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर शहरांतर्गत रस्त्यावरील वाहतुकीस शेतकऱ्यांचा हिरवा कंदील

11:02 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
खानापूर शहरांतर्गत रस्त्यावरील वाहतुकीस शेतकऱ्यांचा हिरवा कंदील
Advertisement

शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून काढला तोडगा : प्रवाशांसह नागरिकांची सोय

Advertisement

खानापूर : खानापूर शहरांतर्गत राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या विकासाचे काम सुरू आहे. हेस्कॉम कार्यालय ते नदी पुलापर्यंतच्या रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. मात्र याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. गेल्या दोन दिवसांपासून आमदार आणि भाजपचे नेते प्रमोद कोचेरी आणि शेतकरी राहुल सावंत, विनायक चव्हाण, गुंडू चौगुले, संदीप देसाई यासह इतर शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून तोडगा काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एका बाजूने हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याने प्रवाशांची व नागरिकांची सोय झाली आहे.

खानापूर शहरांतर्गत रस्त्याचे काम गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. यात राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंत चार कि. मी. रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. हेस्कॉम कार्यालयापासून ते नदी पुलापर्यंत रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. मात्र याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. आणि शेतकऱ्यांनी या रस्त्यावरील वाहतूक बंद पाडली होती. त्यामुळे नागरिकांना, प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना शहरात प्रवेश करण्यासाठी दोन कि. मी. चा वेढा मारून शहरात प्रवेश करावा लागत होता. हा रस्ता सुरू करावा यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा म्हणून व्यापारी संघटनेनेही बंद पुकारला होता. तेव्हापासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुल्या करण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर प्रयत्न सुरू होते. सोमवारी दुपारी शेतकरी आणि आमदार तसेच भाजपचे प्रमोद कोचेरी यासह इतरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. तसेच नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यानंतर तालुक्यातील जनतेचा विचार करून हा रस्ता एका बाजूने वाहतूक सुरू करण्यास शेतकऱ्यांनी होकार दिला. मंगळवारपासून या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने नागरिक व प्रवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बस वाहतूक सुरू करण्याची मागणी

रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर शहराची दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. त्यामुळे शहरांतर्गत रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे सर्व बसेस बायपास रस्त्यावरून जात होत्या. त्यामुळे शहरातील प्रवाशांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. आता शेतकऱ्यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असल्याने या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. नंदगड, हल्याळ तसेच गोवा येथे जाणाऱ्या बसेस आणि बाहेरून येणाऱ्या बसेस शहरांतर्गत रस्त्यावरून सुरू करण्यात याव्यात आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिक व प्रवाशांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.