विक्रमी भात उत्पन्न मिळवीत नेमळेचे शेतकरी सिंधुदुर्गात प्रथम
लक्ष्मण परब यांची विक्रमादित्य शेतकरी म्हणून नोंद
सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित भात पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२४ मध्ये नेमळे, फौजदारवाडी येथील श्री. लक्ष्मण सदाशिव परब यांनी एक नवा इतिहास घडवला आहे. त्यांनी प्रति गुंठा ९९.५० किलो विक्रमी भात (तांदूळ) उत्पन्न मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासातील हे सर्वाधिक प्रति गुंठा भात उत्पन्न ठरले असून, श्री. परब यांचे नाव विक्रमादित्य शेतकरी म्हणून नोंदवले गेले आहे. पंचायत समिती, सावंतवाडी व ग्रामपंचायत पाडलोस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले कृषिमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्य कृषी दिन कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला. लक्ष्मण परब यांच्या वतीने त्यांचे बंधू श्री. चंद्रकांत शंकर परब यांनी हा सत्कार स्विकारला .सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. जाधव , मा. तंत्र अधिकारी श्री. आर आर पाटील , मा. तालुका कृषि अधिकारी श्री. गोरे आणि पाडलोसच्या सरपंच श्रीम. पेडणेकर यांच्या हस्ते शाल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.या यशामुळे नेमळे गावासाठी ही खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. श्री.परब आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नेमळे गावाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. या विक्रमी कामगिरीमागे श्री. परब यांनी अवलंबलेली 'श्री' पद्धतीने भात लागवड, सुधारित बियाण्याचा वापर आणि कृषी निविष्ठांचा वाजवी वापर या त्रिसूत्रीचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच त्यांना हे अभूतपूर्व यश मिळाले आहे.श्री. परब यांच्या या विशेष कामगिरीचे जिल्ह्यातील सर्व स्तरांवरून तसेच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञांकडूनही विशेष कौतुक करण्यात येत आहे. त्यांचे हे यश जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.