For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा! पंजाब- हरियाणा सीमा सील; दिल्लीतील अनेक भाग-सीमांवर कलम 144 लागू

06:46 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा  पंजाब  हरियाणा सीमा सील  दिल्लीतील अनेक भाग सीमांवर कलम 144 लागू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या अनेक मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हरियाणा-पंजाबमधील शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी हरियाणा सरकारने व्यापक उपाययोजना तयार केल्या आहेत. रस्त्यांवर सिमेंटचे बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. तसेच मुख्य मार्गावरही अडथळे तयार करण्यात आले आहेत. यानंतरही शेतकरी दिल्लीत पोहोचण्यात यशस्वी ठरल्यास त्यांना रोखण्याची तयारी दिल्ली पोलिसांनी केली आहे.

एका बाजूने उत्तर प्रदेशमधील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले असतानाच आता पंजाब आणि हरियाणामधील आंदोलकही दिल्लीला पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या आंदोलकांना अटकाव करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राज्यातील अनेक भाग आणि सीमांवर कलम 144 लागू केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याबरोबरच योग्य सावधगिरी बाळगण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. रविवार, 11 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत दिल्लीतील सीमांसह अन्य संवेदनशील ठिकाणी कलम 144 लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून जाहीर करण्यात आलेल्या या निर्बंधामुळे कोणत्याही सीमेवर गर्दी जमू शकणार नाही.

Advertisement

अनेक जिल्ह्यात इंटरनेट बंद

Advertisement

कलम 144 लागू झाल्यामुळे आंदोलकांना ट्रॅक्टर, ट्रॉली, बस, ट्रक, व्यावसायिक वाहने, घोडे इत्यादींवर दिल्लीत येण्यास बंदी असेल. यासोबतच कोणालाही शस्त्रे, तलवारी, त्रिशूळ, काठ्या किंवा रॉड घेऊन दिल्लीत येण्यास मनाई करण्यात आल्याचे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. याआधी हरियाणाच्या खट्टर सरकारने राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवेवर बंदी घातली होती, तर आता पंचकुलामध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याचे डीसीपी सुमेर सिंह प्रताप यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

नोएडा सीमेवरही शेतकऱ्यांचे बस्तान

नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनीही दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-नोएडा, चिल्ला सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकरी नेत्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी सेक्टर-6 उद्योग मार्गावरील वाहनांच्या वाहतुकीवर अंशत: निर्बंध घातले आहेत.

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ली-नोएडा चिल्ला सीमेवरून संसदेकडे मोर्चा काढला. यावेळी सीमेवर आंदोलकांना रोखण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी नोएडा ते दिल्ली मार्ग रोखला.  सर्वजण दिल्लीला जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना सीमेवर अटकाव करण्यात आला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत हेही निदर्शनात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये गुरुवारपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच सर्व सीमेवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
×

.