For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट

11:20 AM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट
Advertisement

पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला : आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने उष्णतेत वाढ

Advertisement

बेळगाव : मान्सून पावसाने ओढ दिली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व तसेच आठ दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी करण्यासह रताळ्यांच्या वेलींची लागवड करण्यासह खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. पण आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पावसाला सुरुवात न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशांत महानगरात एल निनो सक्रिय झाला आहे. गेल्या 50 वर्षांतील सर्वाधिक धोकादायक एल निनो ठरणार असल्याचा अंदाज भारतीय आणि विदेशी हवामान संस्थांनी व्यक्त केला असून निम्मा भारत दुष्काळाच्या छायेत जाऊ शकतो, असेही भाकित वर्तविले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटाची चाहूल लागली असून एल निनोमुळे जगाच्या हवामान चक्रात मोठे फेरबदल होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

पाऊस सुरू होईल या आशेवरच शेतकरी दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पावसाला सुरुवात होते. दरम्यानच्या काळात शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करतात. मात्र, यंदा  अर्धा जून महिना संपला तरी मान्सूनचा थांगपत्ता नाही. पाऊस सुरू होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर पेरणीची कामे उरकून घेतली. विशेष करून येळ्ळूर, वडगाव, जुने बेळगाव या पट्ट्यात शेतकरी धूळवाफ पेरणी करतात. जमिनीत ओलावा असल्याने भातपिके चांगल्या पद्धतीने उगवली आहेत. मात्र, आता सदर पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पण गेल्या आठ दिवसंपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. उन्हाळ्याप्रमाणे उन्हाचे चटके बसत आहेत. कोळपणी करताना भाताची मूळे उघडी पडतात. तशावेळी पाऊस होणे गरजेचे आहे. पण पाऊस गायब झाला असल्याने शेतकरी कोळपणी करतानाही विचार करीत आहेत.

Advertisement

पावसाअभावी भातरोप टाकणेही लांबणीवर

यंदा बी-बियाणांसह खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जोखीम पत्करून शेतकऱ्यांनी पेरणी केली असून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणीचे संकट झेलावे लागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी केल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार नाही. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये हवामान खात्याने सांगितल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले जात आहे.  विशेष म्हणजे कोकणातही अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नाही. खरीप हंगामात भात, सोयाबीन, रताळी, बटाटे, भुईमूग यासह इतर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. तर काही भागात भाताची रोपलागवड केली जाते. पाऊस नसल्याने भातरोप टाकण्याकडेही शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

Advertisement
Tags :

.