For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नूतन जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा

10:38 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
नूतन जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा
Advertisement

शेतकरी गेल्या 12 वर्षांपासून नुकसानभरपाईपासून वंचित : आमदार-तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची निराशा

Advertisement

खानापूर : बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची बेंगळूर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी नूतन जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी पदभार सांभाळलेला आहे. बेळगाव-गोवा महामार्ग निर्मितीसाठी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन आधिग्रहण करण्यात आली होती. मात्र गेल्या 14 वर्षापासून नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी नुकसानभरपाई मिळण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. नूतन जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देतील, अशी अपेक्षा खानापूर तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

बेळगाव-गोवा महामार्गासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचीं नुकसानभरपाई देण्या अगोदर तसेच रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदरच गणेबैल येथे टोलनाका सुरू करण्यात आला होता. या विरोधात शेतकऱ्यांनी जून 2023 मध्ये गणेबैल येथे रास्तारोको आणि उग्र आंदोलन केले होते. 22 जून 2023 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत रात्री उशीरा बैठक घेऊन आपण आठ दिवसात शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देऊ, तसेच जे दावे माझ्याकडे प्रलंबित आहेत ते मी प्राधान्याने शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देवून निकालात काढू, असे जाहीर केले होते. आणि टोल सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. मात्र वर्ष होऊन गेले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. वर्षभर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात खेटा मारुन भेट घेऊन देखील नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतलेला नाही. नुकसानभरपाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे कायमच कानाडोळा करून वेळ मारून नेला होता. तर काही शेतकऱ्यांच्या बाबत लवादाचा निर्णय करताना देखील अन्याय केलेला आहे.

Advertisement

याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बैठकीत निश्चित नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसून काही ठिकाणी रस्त्याच्या बाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. रस्त्यावरील पाण्याचा निचराही योग्य पद्धतीने करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबतही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार विठ्ठल हलगेकर आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निदर्शनास आणून दिले होते. मात्र याबाबतही प्राधिकरणाने कोणताही क्रम घेतलेला नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. नूतन जिल्हाधिकारी तरी शेतकऱ्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करतील का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतकरी गेल्या 13 वर्षापासून नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. रस्त्याचे काम काही प्रमाणात पूर्ण केले आहे. तसेच टोल आकारणीही सुरू केली आहे. मात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून अद्यापही वंचित आहेत. नूतन जिल्हाधिकारी नुकसानभरपाई मिळवून देतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.