अक्रम-सक्रम योजनेअभावी शेतकऱ्यांचा वीज खर्च वाढला
योजना पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी : वीज खर्च परवडत नसल्याने संताप
बेळगाव : राज्यातील विद्युत विभागाने अक्रम-सक्रम योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्याला विद्युत मीटर हवे असल्यास त्याला आपल्या शेतापर्यंत विजेचे खांब, वीजवाहिन्या, तसेच इतर खर्च स्वखर्चातून करावा लागत आहे. एखाद्या सामान्य शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नसल्याने सरकारने अक्रम-सक्रम योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. कृषी मालाला कमी झालेला भाव, मजुरांची वाढलेली मजुरी, अवकाळी पाऊस आणि कीडीचा प्रादुर्भाव अशा अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज दिली असली तरी अक्रम-सक्रम योजना बंद केली.
त्यामुळे शेतकऱ्यांना कृषीपंप हवा असेल तर सध्या असलेल्या ट्रान्स्फॉर्मरपासून आपल्या शेतापर्यंत स्वखर्चाने वीजवाहिन्या, तसेच विद्युतखांब यासाठीचा खर्च करावा लागत आहे. हा खर्च हजारांच्या घरात असल्याने तो परवडणारा नाही. केवळ विद्युतवाहिन्या व विद्युत खांबच नाहीतर विद्युत मंडळाकडे ठेवले जाणारे डिपॉझिट, विद्युत मोटार पाईप, विद्युत बॉक्स, त्यासह कूपनलिका खोदण्यासाठी लागलेला खर्च हा वेगळाच. त्यामुळे लाखो रुपये खर्च येत आहे. यापूर्वी अक्रम-सक्रम योजनेतून शेतकऱ्यांनी 20 ते 22 हजार भरले की शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विद्युतखांब, वीजवाहिन्या, तसेच इतर साहित्याचा पुरवठा केला जात होता. परंतु सध्याच्या सरकारने हे बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकरी संघटनेची आंदोलनाची तयारी
राज्य सरकारने पाच हमी योजना सुरू केल्या असल्यातरी त्याचे ओझे अक्रम-सक्रम योजनेवर लादणे योग्य नव्हते. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी विद्युत विभागाची अक्रम-सक्रम योजना पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.