सत्ताधारी-विरोधकांमध्ये विभागला शेतकरी
नेत्यांच्या इशाऱ्यावर ठरते शेतकऱ्यांची भूमिका
शेतकऱ्यांचा एक गट विरोधात, दुसरा समर्थनार्थ
कोल्हापूरः कृष्णात चौगले
शक्तीपीठ प्रकल्पाला महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एका गटाकडून तीव्र विरोध होत आहे. दुसरीकडे त्याच्या समर्थनार्थ काही शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांना पत्र दिले आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या मेळाव्यातूनही शक्तिपीठला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प काहींना नुकसानकारक वाटत असेल तर तो अन्य शेतकऱ्यांना फायदेशीर कसा वाटतो, या प्रश्नामागेच मोठे राजकारण, अर्थकारण दडले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विभागलेला शेतकरी स्वमतापासून कोसो दूर असून तो नेत्यांच्या दावणीला बांधला गेल्याचे चित्र आहे.
शक्तिपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. त्यांनी ज्या पद्धतीने मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग विकसित केला आहे. त्याच धर्तीवर ते शक्तीपीठ महामार्ग देखील विकसित करण्यासाठी आग्रही आहेत. मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा मोठा विरोध राहिला आहे. त्या विरोधातून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटकासुद्धा बसला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध पाहता हा महामार्ग रद्द केला जाईल, असे आश्वासन दिले होते. पण निवडणुकीनंतर पुन्हा हा प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरु आहेत.
बागायती, पिकाऊ शेतजमीन प्रकल्पासाठी देण्यात शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. ज्यांची नापीक, डोंगराळ जमीन आहे ते शेतकरी या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. या प्रकल्पामुळे हजारो शेतकरी भूमीहीन होणार असले तरी देखील सुपीक, नापिक जमिनीच्या प्रतवारीनुसार आणि सत्ताधारी आणि विरोधी गटानुसार शेतकरी विभागला आहे. परिणामी, शक्तिपीठ विरोधी गटाला खिंडार पडत असून त्याच्या समर्थनार्थ मोठा गट तयार होत आहे. हा प्रकल्प सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावला जाईल, असा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे १२ जिल्ह्यांपैकी ज्या जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा विरोध होईल, तेथून हा महामार्ग जाणार काय? की प्रकल्पाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना अंतर्गत ताकद दिली जाणार, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद
सर्वांना विश्वासात घेऊन जिल्ह्यातून शक्तिपीठ प्रकल्पाचे काम केले जाईल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ घेतलेल्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केले आहे. पण क्षीरसागर हे शहरातील लोकप्रतिनिधी असून ग्रामीण भागाचा याला विरोधच राहील, असे स्पष्टपणे नमूद करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गावरून जिल्ह्यातील महायुतीतील बड्या नेत्यांतील मतभेद समोर आले आहेत.
नेत्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष
विधानसभा निवडणुकीनंतर शासनाने शक्तिपीठ महामार्ग साकारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये कोल्हापुरातून हा प्रकल्प जाणार की नाही, असा मुद्दा तापत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात बोलताना, नको असणारा प्रकल्प लादणार नाही, असे विधान केले होते. मात्र त्यांचे कट्टर समर्थक आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गास असणारी विरोधाची कारणे जाणून घेतली जातील, जनमानसात असणारे गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्ग साकारण्यात येईल, असे मत व्यक्त करून हा प्रकल्प जिल्ह्यातून पुढे नेण्याचे संकेत दिले.
जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडी अशा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शक्तिपीठ विरोधात भूमिका घेतली असताना केवळ क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाला बळ दिले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका एकांगी ठरणार की महायुतीकडून आणखी काही नेते पुढे येणार? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. मुश्रीफ आणि क्षीरसागर यांच्यातील मतभेद पुढे येत असताना आबिटकर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नेते कोणती भूमिका घेतात, शक्तिपीठ प्रकल्पाला जिल्ह्यातून राजकीय बळ मिळणार की विरोधाचा सूर कायम राहणार याकडे संभाव्य बाधित शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
१२ मार्चला आझाद मैदानावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य प्रमुख नेत्यांनी शक्तिपीठ प्रकल्पास तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची मोट बांधली असून १२ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धडक मोर्चा आयोजित केला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.