For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकऱ्याला पत्त्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवले अन् कळपातील बकरा लांबवला; दोघांना अटक

12:03 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेतकऱ्याला पत्त्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवले अन् कळपातील बकरा लांबवला  दोघांना अटक
Advertisement

पन्हाळा: पत्त्याची विचारणा करण्याच्या बहाण्याने शेळ्या राखणाऱ्या शेतकऱ्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या कळपातील बकरा चोरून नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पन्हाळा पोलिसांना यश आले. रमजान महंमद गडकरी (वय २८) आणि रोहित राजेंद्र कार्वेकर (वय ३२, दोघे रा. दानोळी, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकीचा माग काढत पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा बकरा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Advertisement

पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सुर्वेवाडी डोंगरमाळ परिसरात मधुकर हिंदुराव निकम हे आपल्या शेळ्या व बकरा चारण्यासाठी गेले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी निकम यांच्याकडे पत्त्याची विचारणा केली. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांची नजर चुकवत कळपातील एक बकरा दुचाकीवर टाकून दोघांनी पोबारा केला. याप्रकरणी पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयितांची दुचाकी निदर्शनास आली होती. दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी संशयितांचा माग काढत दि. २७ रोजी दोघांना अटक केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.