शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरू- राजेंद्र सुर्यवंशी
बालिंगा ते दाजीपूर 253 कोटीचा राज्यमार्ग रस्ता काम सुरू
पण जमीन संपादन व इतर मागण्यांपासून शेतकरी वंचित
कोल्हापूरः विश्वनाथ मोरे
राज्याचा विकास व्हावा यासाठी केंद्राकडून अनेक महामार्गासह गाव तिथे रस्ता याअंतर्गत रस्त्यांची कामे जोरदार सुरू आहेत. यापैकी एक म्हणजे कोल्हापूर ते दाजीपूर हा राज्यमार्गही मंजूर झाला आहे. यासाठी २५३ कोटींचा निधी मिळाला आहे. सध्या त्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे पण या रस्त्यांमध्ये संपादन केलेली जमीन याचा मोबदला कोण देणार? तसेच या रस्त्याचे काम करताना निर्माण होणारी धूळ ही येण्या - जाणाऱ्यांसाठी, स्थानिकांसाठी घातक ठरत आहे. रस्त्याकडील असणारी शेती व पिके यांची यामुळे हानी होत आहे. या धुळीमुळे अनेक ग्रामस्थांच्या आरोग्यावरीह परिणाम होत आहे.
या सर्व बाबींचा विचार विनिमय करण्यासाठी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी व १० ते १५ गावातील सरपंच, उपसरपंच आणि नागरिक यांच्या उपस्थितीत बीडशेड येथे बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरू, असा ईशारा राजेंद्र सुर्यवंशी यांनी यावेळी दिला.
या बैठकीत ठरलेल्या मागण्या...
या रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळावी किंवा भूमिहीनचा दाखला मिळावा
घाणवडे या गावांमध्ये जेथे मोठे वळण आहे ते वळण काढून रस्ता सरळ काढावा.
बीड शेड येथे व्यापारी वर्गांची जवळपास ४५० दुकाने आहेत, तिथे दिवसाचे काम न करता रात्रीचे करावे.
गावातील गल्लीत रस्ता उंच आहे तेथे समान पातळीत करावे, जेणेकरून घराच्या उंबऱ्यापेक्षा रस्ता उंच नसेल.
सावरवाडी या गावांमध्ये झालेल्या पाईप नुकसान याची भरपाई करून तेथे पाईप टाकण्यात यावी
यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, राज्य महामार्ग MSIDC चे टीम लीडर प्रदीप तिवारी, प्रोजेक्ट मॅनेजर वीरेंद्र बिर्ला ,रेसिडेंट इंजिनियर सागर देशमुख, पाडळी खुर्द गावचे सरपंच तानाजी पालकर,सावर्डे दुमालाचे सरपंच भगवान रोटे, चाफोडीचे सरपंच सातापा सुर्वे, सावरवाडी चे माजी तंटामुक्त अध्यक्ष गजानन खोत, धनाजी खाडे, कंथेवाडीचे माजी सरपंच एकनाथ पाटील, गणेशवाडीचे सरपंच सारिक शिवाजी माने, शिरोली दुमालाचे माजी रेखा मच्छिंद्र कांबळे, सावरवाडीचे उपसरपंच आकाराम जाधव, व इतर शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यमार्गामुळे बालिंगा ते दाजीपूर या भागातील शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये,तसेच रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांच्या असणाऱ्या मागण्या पूर्ण करून रस्त्याचे काम पूर्ण करावे.शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
राजेंद्र सूर्यवंशी. माजी अध्यक्ष, करवीर पंचायत समिती
राज्यमार्गामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी यांना मोबदला मिळाला पाहिजे यासाठी शिरगाव ते कसबा तारळे येथे होणाऱ्या रस्त्याचे काम बंद केले आहे. शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनीचे काय ? याचे उत्तर मिळाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही.
माजी सरपंच एकनाथ पाटील, कंथेवाडी (तालुका राधानगरी )
रस्त्याचे काम चालू असताना निर्माण होणारी धूळ यासाठी पाण्याचे टँकर सकाळ ,दुपार व संध्याकाळ अशा तीन वेळा पाणी मारून उपाययोजना करण्यात येईल.तसेच शेतकऱ्यांच्या फुटलेल्या पाईप या ठिकाणी नवीन पाईप बसवून देण्यात येईल.तसेच बाकीच्या असणाऱ्या समस्या या लवकरात लवकर संपवण्यात येतील.यासाठी शेतकऱ्यांची साथ महत्त्वाची आहे.
प्रदीप तिवारी, MSIDC चे टीम लीडर