शेतकऱ्यांची प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी
तासगाव :
कृत्रिम (प्लास्टिक) फुलांच्या वाढत्या वापरामुळे पारंपारिक आणि आधुनिक फुलशेती व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. या कृत्रिम फुलांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी सांगली जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, सांगली जिल्हा हा पूर्वीपासून फुलशेतीमध्ये राज्यात दिशादर्शक राहिला आहे. जिल्ह्यात गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंध, मोगरा, चाफा यांसारखी पारंपरिक फुले तसेच जरबेरा, जिप्सोफिला, कार्निशन डच गुलाब, ऑर्किड यांसारखी हरितगृहांमधील विदेशी फुले पिकवणारे हजारो शेतकरी आहेत. सन २००० ते २०१५ पर्यंत जिल्ह्यात ३०० ते ४०० हरितगृह शेतकरी होते. मात्र, भारतीय बाजारपेठेत कृत्रिम फुलांच्या तर शिरकावामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ३५ ते ५० हरितगृह शेतकरी शिल्लक राहिले आहेत.
गेल्या १० वर्षांत कृत्रिम फुलांच्या विळख्यामुळे पारंपरिक फुलशेतीवरही विपरीत परिणाम झाला आहे. सणासुदीलाही झेंडू शेवंती, मोगरा यांच्या कृत्रिम माळा सर्वत्र उपलब्ध असल्याने नैसर्गिक फुलांना बाजारपेठ मिळत नाही. यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. फुलशेतीचे क्षेत्रही झपाट्याने कमी होत चालले आहे.
फुलशेती केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे मजूर, वाहतूकदार, फुल व्यावसायिक, फुल आडते, फुल सजावट कारागीर यांसारख्या अनेकांना रोजगार निर्माण करते. फुलशेती बंद झाल्यास या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. याशिवाय, फुलांवर बसणाऱ्या मधमाशांमुळे इतर शेती पिकांचे परागीभवन होऊन उत्पादन बाढते. फुलशेती पूर्णपणे बंद झाल्यास मधमाशांचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कृत्रिम फुलांमध्ये वापरले जाणारे रंग मानवी शरीरास अत्यंत घातक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. याकडेही फुल उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जिल्हा कृषी अधिक्षक विवेक कुंभार यांनाही शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
- ... अधिवेशनातही प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी...
पावसाळी अधिवेशनात आमदार महेश शिंदे यांनी या संदर्भातील लक्षवेधी विधानसभेत उपस्थित केली होती. या बाबत महेश शिंदे यांनी राज्यात अनेक समारंभात, लग्नकार्यात, मंदिरांमध्ये कृत्रिम फुलांचा अतिरिक्त वापर केला जात आहे. फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली असून त्याचा थेट फटका राज्यातील फुलोत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचे म्हंटले आहे. यावेळी आमदार कैलास पाटील, नाना पटोले, नारायण कुचे यांनीही कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी केली. दरम्यान गेल्या अधिवेशनात आमदार रोहित पाटील यांनीही या प्रश्नावर आवाज उठवला होता.