विकसित भारतासाठी शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे – खासदार धनंजय महाडिक
व्हन्नाळी (ता. कागल) येथे 'विकसित कृषि संकल्प अभियान'ला सुरूवात
कागल :
शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकऱ्यांच्या प्रगतीविना विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे. त्यासाठी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथे ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाडिक म्हणाले, “पूर्वी सरकारी योजना पंचतारांकित हॉटेल्समध्ये जाहीर होत असत आणि ५-१० वर्ष उलटूनही लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचत नसे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून या योजना जाहीर करतात, त्यामुळे जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचते."
या अभियानामार्फत कोणत्या जमिनीत, कोणत्या हवामानात कोणते पीक घेता येईल याची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शंका, प्रश्नांचे निरसन करून त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाडिक यांनी पुढे सांगितले की, "देश अजूनही कृषीप्रधान आहे. त्यामुळे नवतंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा अधिकाधिक वापर करून उत्पादन वाढवणे गरजेचे आहे."
या अभियानाच्या अंतर्गत पुढील १५ दिवसांत देशभरातील २० हजार शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना भेटणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ९० गावांमध्ये हे अभियान राबवले जाणार असल्याची माहिती डॉ. रविंद्र सिंह यांनी दिली.
या कार्यक्रमाला आत्मा प्रकल्पाचे रक्षक शिंदे, डॉ. प्रशांत कवर, डॉ. विद्यसागर गोडाम, डॉ. राजेंद्र वावरे, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, के.बी. वाडकर, डॉ. पुष्पनाथ चौगुले यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले व शेतकऱ्यांच्या कृषीविषयक शंकांचे निरसन केले.
यावेळी धनराज घाटगे, अॅड. अमर पाटील, सरपंच दिजीप कडवे, डॉ. नरेंद्र गजभिये, डॉ. राहुल यादव, एम.टी. पोवार, सुरेश मर्दाने, संजय वाडकर, दीपक हातकर, डॉ. पांडुरंग काळे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.