आम्ही शेती करायची की नाही, शेतकऱ्यांचा वनविभागाला सवाल
कोल्हापूर
पन्हाळा गडाच्या पायथ्याशी साधारण ३५०० एकर शेतीचे नुकसान गव्यामुळे होत आहे. गव्यांच्या नुकसानीमुळे गेले ४ वर्ष या परिसरातील अनेक शेतकरी शेती करत नाही आहेत, तरी या गव्यांचा योग्य बंदोबस्त करा अशी मागणी उपवनसंरक्षक जी. गुरू प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात शेतकऱ्यांसाठीचा चेन फेन्सिंगचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन उपवनसंरक्षक यांनी यावेळी दिले.
पन्हाळा गडाच्या पायथ्याशी सोमवार पेठ, तुरुकवाडी आणि लक्ष्मी कुरण या परिसरातील शेतीवर ६०० कुटुंब अवलंबून आहेत. चार वर्षांपासून गव्यांचा कळप शेतीचे नुकसान करत असल्यामुळे शेती करणं बंद केले आहे. भात, भुईमूग, सोया अशा प्रकारची पिकं येथे घेतली जात होती. हा भाग दुर्गम असल्यामुळे शेतीही पावसावर अवलंबून आहे. ४० ते ५० गवे एकावेळी येत असल्यामुळे शेतकरी, विशेषतः स्त्रिया शेतावर कामासाठी जाण्यास घाबरत आहेत. गव्यांनी केलेल्या नुकसानीचे वनविभागाकडून वेळोवेळी पंचनामे केले जातात, पण या नुकसानभरपाईचा मिळालेला मोबदला तुलनेत कमी असतो. तसेच वनविभागाच्या वनशेतीभोवती सौरकुंपण आहे, तसेत शेतकऱ्यांच्या शेतीभोवती सौरकुंपण द्यावे, यांसह अनेक मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.