Kolhapur News : शेतकऱ्यांनो सावधान...! बिद्रीत ऊसतोडीत तब्बल पाच फुटी विषारी घोणस सापडला
ऊसतोडीत घोणस आढळल्याने शेतकऱ्यांत खळबळ
सरवडे : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव बिद्री (ता.कागल ) येथील ऊस तोडणाऱ्या शेतकऱ्यांना आला. तुटलेल्या उसाचा पाला गोळा करत असताना घोणसाच्या आवाजाने सारे जण घाबरले. उसाच्या पाण्यात लपला होता तब्बल पाच फुटी विषारी घोणस! सर्पमित्र सयाजी चौगले यांनी त्याला पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला. उसाच्या फडात काम करताना शेतकऱ्यांनो सावधान स्वतःला सांभाळून काम करा असे आवाहन सर्पमित्र सयाजी चौगले यांनी केले आहे.
बिद्री येथील अनिल विलास पाटील यांची ऊसतोड सुरू आहे. तुटलेल्या उसाचा पाला गोळा करत असताना त्यांना कुकरच्या सिटी सारखा आवाज आला. हालचाल झाल्याने त्यांना संशय आला. उत्सुकतेने त्यांनी लांबूनच निरीक्षण केल्यानंतर मोठा साप उसाच्या पाल्याखाली बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तात्काळ त्यांनी तेथे काम करणाऱ्या माणसांना बाजूला जायला सांगून त्याची कल्पना दिली. सर्पमित्र सयाजी चौगले यांच्याशी अनिल पाटील यांनी संपर्क साधला. घटनास्थळी भेट दिल्यानंतर तो अति विषारी पूर्ण वाढ झालेला घोणस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता घोणसाला चौगले यांनी पकडले. ऊस तोडणारी माणसे तिथे जवळच होती त्यामुळे अनिल पाटील यांच्या रूपाने वाईट घटना टळली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव उपस्थितांना आला.