Electric pump Cable theft in Aatpadi विद्युतपंपाच्या केबल चोरीविरोधात आटपाडीचे शेतकरी आक्रमक
आटपाडी तलावातील शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबलची पुन्हा एकदा चोरी झाली आहे. सलग तीनवेळा केबल चोरीच्या घटना घडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारत संताप व्यक्त केला. पोलिसांनी तलावातील शेतकऱ्यांच्या केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
आटपाडी तलावातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युतपंपाच्या केबलची चोरीची घटना रविवारी उजेडात आली. यापूर्वी दोनवेळा येथील शेतकऱ्यांच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. तांब्याच्या तारा काढून त्याच्या विक्रीचा उद्योग करणाऱ्या चोरट्यांनी सातत्याने पोलिसांसह शेतकऱ्यांंना आव्हान देत केबल चोरीचा सिलसिला कायम ठेवला आहे.
आटपाडी आणि परिसरात चोरांचा धुमाकूळ
आटपाडीसह निंबवडे, शेटफळे, बनपुरी-कचरेवस्ती येथेही केबल चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु चोरट्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी आणि पोलिसांना आव्हान देत चोरट्यांनी आटपाडी तलावातील परवानाधारक शेतकऱ्यांच्या विद्युतपंपाच्या पूर्ण केबल चोरून नेल्या. पोलिसात यापूर्वीच्या चोरीच्या तक्रारी करूनही तपास झाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तलावावरून थेट आटपाडी पोलीस ठाणे गाठत ठिय्या मारला.
आनंदराव पाटील, भारत पाटील, मुरलीधर पाटील, शरद पाटील, दादा देशमुख, वैभव देशमुख, लक्ष्मण सरगर, साहेबराव हाके, मच्छिंद्र खंडगाळे, वसंतराव पाटील, जयप्रकाश चव्हाण, रोहित सागर, दत्तात्रय पाटील, राहुल विभुते, गणपत चव्हाण, बाबासो जाधव, वसंत जाधव, यांच्यासह शेतकऱ्यांनी पोलिसांचे शेतकऱ्यांच्या केबल चोरीकडे दुर्लक्ष असल्याचे सांगत आक्षेप घेतले. पोलीस निरीक्षक विनय बहिर मोबाईलवरून शेतकऱ्यांशी बोलत आठ दिवसात चोरीचा छडा लावण्याची ग्वाही दिली.
उपनिरीक्षक खरात यांची कडक भाषा आणि वाद
उपनिरीक्षक खरात यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना वापरलेल्या कडक भाषेमुळे तणाव निर्माण झाला. भारत पाटील, आनंदराव पाटील यांनी उपनिरीक्षक खरात यांच्या दरडावलेल्या स्वरातील भाषेवर आक्षेप घेत यापूर्वीच्या चोरीचा किती दिवस तपास करत आहात? तलावावर गस्त असलेतर चोऱ्या कशा होतात असे प्रश्न केले. एका शेतकऱ्याची नव्हेतर सर्व शेतकऱ्यांची फिर्याद घेतली पाहिजे, अशा मागण्या करत शेतकऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकांना प्रत्युत्तर दिले.
केबलमधील तांबे काढून विकणारी टोळी
सपोनि बिश्वेंंद्रसिंह बायस यांनी पोलिसात धाव घेत शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे समाधान केले. त्यांच्याकडेही शेतकऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक खरात यांची तक्रारदार शेतकऱ्यांना मिळालेल्या वागणूकीबाबत नाराजी व्यक्त केली. सपोनि बायस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत याबाबत कारवाई होईल, अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या केबल चोरी करून तांबे काढून विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोरट्यांंना जेरबंद न केल्यास बेमुदत धरणे छेडण्याचा इशारा आनंदराव पाटील, भारत पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.