Kolhapur News : कोल्हापूरच्या शेतकरी महिलांची सोशल मीडियावर धुमाकूळ
राजगोळीच्या महिलांची धमाल रील्स व्हायरल
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील राजगोळी या गावातील शेतकरी महिलांनी भातकापणी करताना तयार केलेल्या रील्सना सध्या सोशल मीडियावर मोठी दाद मिळत आहे. हातात विळा, डोक्यावर उन्हाचा तडाखा, अंगावर घामाच्या धारा अशा रणरणत्या वातावरणातही या महिलांनी गाण्याच्या ठेक्यावर थिरकत केलेल्या कामाचे कौतुक जिल्ह्याभरातुन होत आहे.
आजचे युग हे रिल्सचे युग म्हणून ओळखले जाते. पूर्वी फक्त सिनेसृष्टीतील कलाकारच समाजाच्या नजरेत यायचे; मात्र मोबाईल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे सामान्य माणूसही थेट जगभरात पोहोचू लागला. अशा परिस्थितीत शेतकरीही आता केवळ कष्टात नव्हे, तर आनंदात शेती करण्याकडे वाटचाल करत असल्याचे हे उदाहरण सांगते.
शेतात कितीही कष्ट असले तरी उत्साह, मैत्री आणि गाण्याची साथ मिळाली की कठीण कामेही सहज पार पडू शकतात, हे सरिता वाडकर, रंजना बैळी, साधना कदम, शुभांगी सुतार आणि शालन गुरव या पाच जिवलग मैत्रिणींनी दाखवून दिले आहे.
२०१९ मध्ये कोरोना काळात सर्वत्र भीती, दडपण आणि मृत्यूचे वातावरण होते. त्यानंतर लोकांनी काम तर करायचे, पण हसत-खेळत, आयुष्याचा आनंद घेत जगायचे, असा दृष्टिकोन स्वीकारला. त्याचीच झलक आज गावोगावी आणि सोशल मीडियावरील अशा रील्समध्ये दिसत आहे.
राजगोळीतील या महिलांची कापणीतील मेहनत, त्यातील आनंद आणि एकत्रित मैत्रीचा जल्लोष यामुळे ही रील लोकांच्या मनावर राज्य करत आहे.