शेतकरी नेत्यांची तुरुंगातून सुटका
सर्वनसिंग पंधेर यांचा पंजाब सरकार-प्रशासनाविरुद्ध संताप
वृत्तसंस्था/ चंदीगड
पटियाला, मुक्तसर, नाभा आणि फरीदकोटसह विविध तुरुंगांमधून डांबून ठेवण्यात आलेल्या शेतकरी नेत्यांची शुक्रवारी सुटका करण्यात आली. अटक केलेल्या नेत्यांना पहाटे 3 वाजता सोडण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाने 28 मार्च रोजी उपायुक्त कार्यालयांसमोर दडपशाहीच्या विरोधात निषेधाचे नियोजन केले असतानाच या नेत्यांची सुटका करण्यात आली आहे.
पंजाबचे शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांचीही तुरुंगातून सुटका झाली आहे. सुटकेनंतर त्यांनी बहादूरगड किल्ल्यावर पोहोचून तेथे पत्रकार परिषद घेतली. तुरुंगातून बाहेर येताच सर्वनसिंग पंधेर यांनी पंजाब सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. शेतकरी नेत्यांना तुरुंगात टाकत आंदोलन उद्ध्वस्त केल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्याबद्दलही भाष्य केले.