For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; सहाव्या दिवशीही अंत्यसंस्कार नाहीत, आंदोलन आणखी तीव्र

05:49 PM Sep 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू  सहाव्या दिवशीही अंत्यसंस्कार नाहीत  आंदोलन आणखी तीव्र
Advertisement

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान धुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाविरोधात सुरू केलेले ठिय्या आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच आहे. मागण्यांवर अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले असून, धुर्वे यांच्या मृतदेहावर अद्याप अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत.

Advertisement

पीडित कुटुंबीयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेसचे उदय मेघे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू होती. मात्र, चर्चेतून अपेक्षित तोडगा निघाला नसल्याने आंदोलनाची भूमिका अधिक आक्रमक करण्यात आली आहे.

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत देण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. गावातील परिस्थितीत सुधारणा करण्याबाबत प्रशासनानेही काही उपाययोजना सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

Advertisement

प्रशासनाने ग्रामस्तरीय समिती, स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांशी संवाद साधून ग्रामस्थांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले आहे. तसेच वन विभागाकडून पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला कंत्राटी वाहनचालक किंवा वनमजूर म्हणून काम देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या परमानंद काठरा विरुद्ध भारत सरकार या १९८९ मधील निर्णयाचा संदर्भ देत मृत व्यक्तीच्या सन्मानाचा अधिकारही महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने ग्रामस्थांना सांगितले आहे. मृतदेहावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाची तोडगा काढण्याची धडपड

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, बोर अभयारण्याचे उपसंचालक मंगेश ठेंगडी आणि उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी उपस्थित होते.

मात्र, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतरही आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे रायपूर येथील या आंदोलनाकडे आता प्रशासनासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

Advertisement

.