गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
बांबोळीत उपचार सुरू ; आंबेगाव येथील घटना
ओटवणे प्रतिनिधी
गव्या रेड्यांच्या कळपातील एका गवारेड्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात आंबेगाव चावडीवाडी येथील दत्ताराम सखाराम कुंभार (६५)) हे शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आंबेगाव - कुणकेरी या सिमे दरम्यान घडली. सध्या दत्ताराम कुंभार यांच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दत्ताराम कुंभार नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील काम आटोपून घरी येत असताना या कळपातील गव्यांपैकी एका गव्याने दत्ताराम कुंभार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जमिनीवर पडले. त्यानंतर आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ धावून आले. या हल्ल्यात दत्ताराम कुंभार यांच्या शरीराच्या बरगड्या तुटल्या. उपचारासाठी त्यांना प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांना गोवा बांबोळी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या बरगड्यांना जबर मार लागल्यामुळे रक्तस्त्राव झाला असून त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वन खात्याला या घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे कुणकेरी - आंबेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन या धोकादायक गव्या रेड्यांच्या कळपाचा बंदोबस्त करावा तसेच दत्तराम कुंभार यांना वैद्यकीय उपचारासह योग्य भरपाई द्यावी. अशी मागणी सरपंच शिवाजी परब यांनी केली आहे.