For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गवारेड्याच्या हल्ल्यात शिरशिंगेतील शेतकरी गंभीर जखमी; उपजिल्हा रुग्णालयात दाखल

गवारेड्याच्या हल्ल्यात शिरशिंगेतील शेतकरी गंभीर जखमी  उपजिल्हा रुग्णालयात दाखल
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सह्याद्री पट्ट्यात गवारेडे आणि रानगायींच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शिरशिंगे गोठवेवाडी येथील शेतकरी सोमण विठ्ठल घावरे (वय ७०) यांच्यावर गवारेड्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

घावरे हे भात शेतीची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या गवारेड्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून शिरशिंगे गोठवेवाडी परिसरात गवारेडे व रानगायींचा वावर वाढला असून त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी भात शेतीची लागवड केली होती. मात्र, या जंगली जनावरांनी शेतात घुसून उभी पिके उद्ध्वस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Advertisement

घटनेच्या दिवशी सायंकाळी श्री. घावरे यांच्या भात शेतीत गवारेड्यांनी नुकसान केले होते. त्याची पाहणी करण्यासाठी ते गेले असता शेती पूर्णपणे चिखलमय झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी गवारेड्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता एका गवारेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकाराची माहिती शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांनी वन विभागाला दिली असून त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या भागात गवारेडे व रानगायींनी दहशत निर्माण केली असून शेतकरी शेतीत जाण्यासही घाबरत आहेत. याबाबत आमदार दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे.

वन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

Advertisement
Tags :

.