For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Farmer Dies in Bison Attack चांदोली परिसर हादरला! गव्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

10:03 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
farmer dies in bison attack चांदोली परिसर हादरला  गव्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
Advertisement

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांदोली परिसरातील शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथे थरारक आणि दुर्दैवी घटना घडली. शेतात वैरण काढण्यासाठी गेलेल्या यशवंत मारुती यादव (वय ७५) या वृद्ध शेतकऱ्यावर गवा रेड्याने प्राणघातक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यादव यांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात आणि शेतकरी वर्गात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

घटना स्थळावरून व परिसरातील शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ च्या सुमारास यशवंत यादव नेहमीप्रमाणे आपल्या मालकीच्या 'शिराळे-गळा' येथील शेतात गुरांना वैरण (चारा) काढण्यासाठी गेले होते. ते उसाच्या पिकात वैरण काढत असताना, अचानक एक बेफाम आणि सैरावैरा पळत आलेला गवा रेड्या त्यांच्यासमोर आला.

काही समजण्याच्या आतच गव्याने यादव यांना आपल्या शिंगावर उचलून जोरदारपणे जमिनीवर आपटले आणि तुडवले. याचवेळी शेजारच्या शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी यादव यांचा ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी आरडाओरडा करत घटनस्थळाकडे धाव घेतली. शेतकऱ्यांचा वाढता गोंगाट पाहून गव्या रेड्याने तेथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

Advertisement

उपचारापूर्वीच निधन

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यादव यांना स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने तातडीने उचलून प्राथमिक आरोग्य केंद्र, शित्तूर-वारुण येथे आणले. मात्र, त्यांची प्र-कृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ 'कृष्णा हॉस्पिटल, कराड' येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, कराडकडे जाताना शेडगेवाडी परिसराजवळ पोहोचताच यादव यांची प्र-णज्योत मालवली. त्यांच्या निधनाने यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चांदोली आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वन्यजीवांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर कमालीचा वाढला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. गव्याने आपल्या टोकदार शिंगाने इतके गंभीरपणे हल्ला केला होता की यादव यांच्या पोटातील आतडी बाहेर आली, तसेच त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हा चौथा बळी

बिबट्या हल्ल्यात दोन व गव्याच्या हल्ल्यात दोन अशा चौघांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत २ लहान निष्पाप मुलींचा जीव गेला आहे तर गव्याच्या हल्ल्यात या आधी १ शेतकरी दगावलेला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील यादव यांचा हा चौथा बळी आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकजण जखमी झाले तर काहीजण कायमचे अधू झाले आहेत. अजून किती जणांचा बळी घेणार आहे वनविभाग, वन विभागाला जाग कधी येणार? असा संतप्त सवाल आता शेतकरी व ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :

.