For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

04:16 PM Jan 09, 2025 IST | Radhika Patil
ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू
Advertisement

वाठार किरोली : 

Advertisement

हार्वेस्टरद्वारे तोडलेला ऊस पाठीमागून गोळा करणाऱ्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबवडे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथे घडली आहे. अरुण धर्माजी जाधव (वय : 51) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते अंबवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्यही आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार रात्री साडेआठच्या सुमारास अंबवडे संमत कोरेगावच्या डोंगर नावाच्या शिवारात किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासाठी अरुण जाधव यांच्या शेतातील उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे गतीने सुरू होती. ही तोडणी सुरू असताना या हार्वेस्टरद्वारे तोडलेल्या उसाच्या कांड्या एका ट्रॅक्टरद्वारे गोळा करून ट्रॉली भरली जात होती. लगतच अंधारात अरुण जाधव हे इतर कांड्याही वेचत होते. हे काम सुरू असताना अचानक कांड्या गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरखाली ते सापडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने कोरेगाव येथे एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. तेथून त्यांना सातारा सर्वसाधारण रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत येथील पोलिसात झालेली नव्हती. मृत पावलेले अरुण जाधव हे अंबवडे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते. प्रगतशील शेतकरी आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंबवडे संमत कोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Tags :

.