For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जड अंत:करणाने गणरायाला निरोप

08:05 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
जड अंत करणाने गणरायाला निरोप
Advertisement

विसर्जन सोहळ्यात ‘पुढच्या वर्षी लवकर या...’चा गजर :  बेळगावात विसर्जन मिरवणूक लांबली

Advertisement

श्री गणरायाचे आगमन झाल्यानंतर गेले बारा दिवस उत्साहाने आणि चैतन्याने सळसळत असलेल्या बेळगाव शहराने शुक्रवारी बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत श्रीमूर्तींचे विसर्जन करताना सर्वांचे डोळे पाणावले व अंत:करण जड झाले.

 त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : गेल्या 12 दिवसांपासून मंडपात प्रतिष्ठापना केलेल्या लाडक्या बाप्पाला बेळगावकरांनी जड अंत:करणाने निरोप दिला. सायंकाळी हुतात्मा चौकातून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’च्या एकच गजरात संपूर्ण बेळगाव शहर दुमदुमून गेले. ढोल, ताशांच्या दणदणाटात, हलगीच्या ठेक्यावर, गुलालाच्या उधळणीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याने शहरात भक्ती आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले.

शुक्रवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चौकातील गणेशमूर्तीचे महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली, आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, गुरुसिद्ध महास्वामी-कारंजीमठ, हरिगुरु महाराज-रुद्रकेशरीमठ, माजी आमदार अनिल बेनके, लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, मध्यवर्ती महामंडळाचे रणजीत चव्हाण-पाटील, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, मनपा आयुक्त कार्तिक एम, डॉ. रवी पाटील, सुनील जाधव, धनंजय जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी डॉ. रवी पाटील यांच्यावतीने गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

शहरात सुमारे 370 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मात्र रात्री उशीरापर्यंत मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या नगण्य होती. काही मोजक्याच मंडळांच्या गणेशमूर्ती रात्री 12 नंतर विसर्जन मार्गात सहभागी झाल्या. हुतात्मा चौकातून रामदेव गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली मार्गे कपिलेश्वर तलाव, रामेश्वर तीर्थ (जक्केरी होंड) यासह वेगवेगळ्या तलावांकडे सार्वजनिक श्रीमूर्ती मार्गस्थ झाल्या. प्रत्येक मंडळासोबत दोन ते तीन ढोलताशा पथक, बेंजो, हलगीवादक पथके होती तर कांही मंडळांनी लाऊड स्पीकर लावले होते. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या मूर्तीं सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. तरुणाई पारंपरिक वेशात ढोलाच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होती. गुलालाची मुक्त उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे मिरवणूक मार्गावर उत्साहाचे वातावरण होते.

विसर्जन काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. तसेच दोन अतिरिक्त आयपीएस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. मुख्य विसर्जन मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. गेले 12 दिवस अत्यंत भक्तिभावाने बाप्पाची पूजाअर्चा आणि सेवा केल्यानंतर अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. ‘बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आम्हाला,’ अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

यंदाची श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक गतवर्षीपेक्षा लवकर पार पाडावी यासाठी प्रशासनाकडून गेल्या महिनाभरापासून नियोजन केले जात होते. मात्र काही गणेशोत्सव मंडळांनी रात्री उशीरापर्यंतही मिरवणुकीत सहभाग घेतला नाही. शनिवारी दुपारपर्यंत बहुतांश मंडळांच्या श्रीमूर्ती मंडपातच होत्या. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला विलंब होणार हे मात्र निश्चित आहे. दरवर्षी लांबत चाललेल्या विसर्जन मिरवणुकीचा ताण बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व पोलिसांवर वाढत चालला आहे. विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पाडावी, गालबोट लावणारी कोणत्याही प्रकारची घटना घडू नये यासाठी हेस्कॉम, वन, महापालिका, पोलीस यासह विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारपासून परिश्रम घेत आहेत. महानगरपालिकेकडून जुना कपिलेश्वर तलाव येथे तीन, नवीन कपिलेश्वर तलावावर चार, जक्केरी होंड तीन, अनगोळ तलाव, कलमेश्वर तलाव जुने बेळगाव, ब्रह्मदेव मंदिर मजगाव, किल्ला तलाव, कणबर्गी तलाव या ठिकाणी प्रत्येकी एक क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या उंचीच्या श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येऊ नये असे आवाहन दरवर्षी प्रशासनाकडून केले जाते. पण त्याकडे दुर्लक्ष करत मूर्तींची उंची वाढतच चालली आहे. त्यामानाने सध्या उपलब्ध असलेल्या तलावांची क्षमता कमी असल्याने मोठ्या आकाराच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करताना समस्या निर्माण होत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणी मंडपातच श्रीमूर्ती होत्या. कपिलेश्वर नवीन तलाव, जुना तलाव आणि जक्केरी होंड येथे 20 जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापही श्रीमूर्तींचे विसर्जन होणे बाकी असल्याने तलाव अपुरे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची चिंता प्रशासनाला लागून राहिली आहे.

शनिवारी सर्वप्रथम विसर्जन झालेले गणपती

माळी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव (व्यापारी बंधू) खासबाग, बसवेश्वर सर्कल, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरगुंदकर भावे चौक, दाणे गल्ली शहापूर, हुतात्मा चौक, अनसूरकर गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, सोमवारपेठ टिळकवाडी, दैवज्ञ ब्राह्मण समाज महात्मा फुले रोड, बसवाण गल्ली शहापूर काकेरी चौक, महात्मा फुले रोड तुकाराम बँक, फोर्ट रोड, नार्वेकर गल्ली शहापूर.

सर्वप्रथम श्रीमूर्ती विसर्जन करण्याचा मान माळी गल्लीला

बेळगावचा लंबोदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळी गल्ली येथील श्री गणेशोत्सव मंडळाने ड्रायफ्रुडस्च्या माध्यमातून साकारलेल्या श्रीमूर्तीचे नवीन कपिलेश्वर तलावावर शुक्रवारी दुपारी 3 वाजता आगमन झाले. विधिवत पूजा पार पाडल्यानंतर 3.30 च्या सुमारास मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे सर्वप्रथम श्रीमूर्ती विसर्जन करण्याचा मान माळी गल्लीला मिळाला. त्यामुळे या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनीही घेण्यासारखा आहे.

शहरातील रस्ते गणेशभक्तांनी गेले होते फुलून

बेळगावच्या गणेशोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. पुणे, मुंबईच्या धर्तीवर गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथून गणेशभक्त येत असतात. या पार्श्वभूमीवर रात्रभर हॉटेल्स व खाऊचे स्टॉल्स सुरू होते. महानगरपालिकेकडून सर्वत्र विद्युत रोषणाई, प्रेक्षक गॅलरी, मोबाईल टायलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्यांचीही नियुक्त करण्यात आली होती. रात्रीपासून पहाटेपर्यंत शहरातील रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते.

बाप्पांचे पुढील वर्षी लवकर होणार आगमन

बाप्पांना शुक्रवारी भावपूर्ण निरोप देताना भाविक ‘पुढल्या वर्षी लवकर या,’ असे म्हणत होते. भक्तांच्या या हाकेला प्रतिसाद देत बाप्पांचे पुढल्या वर्षी लवकरच आगमन होणार आहे. यावर्षी 14 सप्टेंबरला बाप्पांचे आगमन झाले होते. पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये 10 दिवस अगोदरच आगमन होणार आहे. 4 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून या दिवशी घरोघरी व सार्वजनिक मंडपातून बाप्पा विराजमान होणार आहेत.

यंदाचे विसर्जन लांबण्याची शक्यता

विसर्जन मिरवणुकीत सर्व मंडळांनी आपल्या श्रीमूर्ती लवकर सामील कराव्यात, असे आवाहन वारंवार करूनदेखील बहुतांश मंडळांना त्याचा विसर पडल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारी व सायंकाळनंतर अनेक मंडळांच्या श्रीमूर्ती मार्गस्थ झाल्या. रात्रीपासून विसर्जन तलावाकडे येण्यासाठी मोठ्या प्रमाणात मूर्ती थांबून आहेत. त्यामुळे यंदाचे विसर्जन लांबण्याची शक्यता आहे. विसर्जन लांबत चालल्याने याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे.

डीजेचा आवाज काहीअंशी सौम्य

एक मात्र मान्य करायला हवे, की यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज काहीअंशी सौम्य झाला. याबद्दल पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते यांचे मात्र अभिनंदन करायला हवे. डीजेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना प्रशासनाने मंडळांना दिली होती. रुग्णांचा विचार करा, असे आवाहन बिम्सचे कार्यकारी संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी केले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने 70 डेसीबलची मर्यादा ठेवून सर्व मंडळांवर काटेकोरपणे लक्ष ठेवले त्यामुळे डीजेच्या दणदणाटापेक्षा यंदा वाद्यांची थाप अधिक स्वागतार्ह ठरली.

Advertisement
Tags :

.