For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जड अंत:करणाने तालुक्यात लाडक्या बाप्पाला निरोप

11:12 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
जड अंत करणाने तालुक्यात लाडक्या बाप्पाला निरोप
Advertisement

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष : टाळ मृदंगासह पारंपरिक वाद्यांचा गजर :  ग्रामीणमध्ये विसर्जन मिरवणुका जल्लोषात- शांततेत

Advertisement

वार्ताहर/किणये 

’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’असा जयघोष करीत मंगळवारी तालुक्यात घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे भक्तिमय वातावरण विसर्जन करण्यात आले. जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला भक्तांनी निरोप दिला. सकाळपासून घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन सुरू करण्यात आले. तर दुपारनंतर व काही ठिकाणी सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला सुऊवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. तसेच टाळ मृदंग, लेझीम, ढोलताशांचा गजर करण्यात आला. तालुक्याच्या मार्कंडेय नदी व मुंगेत्री नदी तसेच तलाव, सार्वजनिक विहिरी, नदी नाले आदी ठिकाणी श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Advertisement

तालुक्यात सोमवारी काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली. यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण होणार की काय याची चिंता लागून राहिली होती. मात्र मंगळवारी सकाळपासूनच पावसाने उघडीप दिल्यामुळे भक्तांचा उत्साह अधिक वाढला होता. काही मंडळांनी सार्वजनिक मांडपामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन केले. तर काही ठिकाणी प्रवचन व कीर्तन, निरूपणाचे कार्यक्रम झाले. काही गावांमध्ये सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. तसेच सुबक व मनमोहक अशा श्रीमूर्ती होत्या. हे पाहण्यासाठी ग्रामीणमधील भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मंगळवारी बाप्पाला निरोप देण्याचा दिवस असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

बहाद्दरवाडीत ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा

बहाद्दरवाडी गावात एक गाव एक गणपती परंपरा जपण्यात आली असून विसर्जन मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. ही मिरवणूक संपूर्ण गावभर फिरली. प्रत्येकाच्या घरासमोर मिरवणुकीचे महिला आरती ओवाळून स्वागत करीत होत्या.

किणये

किणये गावातील घरगुती गणपती बेळगाव-चोर्ला रोड किणयेजवळ असलेल्या मुंगेत्री नदीच्या पुलाच्या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. नागरिक सजवलेले ट्रॅक्टरमधून गणपतीच्या मूर्ती आणत होते. या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी झाली होती. कर्ले गावात सकाळीच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाला सुऊवात करण्यात आली. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीला सुऊवात केली. कर्ले गावात डॉल्बीला पूर्णपणे फाटा देण्यात आला. असून टाळ मृदंग व भजनाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

जानेवाडी

जानेवाडी गावात एक गाव एक गणपतीची परंपरा जपण्यात आली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजनही केले होते. विसर्जन मिरवणुकीला गावातील सर्व नागरिक एकत्र आले होते. मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. नावगे येथील रामलिंग तीर्थकुंडाच्या बाजूला असलेल्या तलावात सकाळी घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.तर सायंकाळी सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले.

बेळगुंदी

बेळगुंदी गावात एक गाव एक गणपतीची परंपरा जपण्यात आली. अकरा दिवस गावातील विविध भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम व विविध अध्यात्मिक कार्यक्रमही झाले. रोज सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या ग्रामीणच्या राजाची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरू होती अगदी शांततेत गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

वाघवडेत मुंगेत्री नदीच्या पुलाजवळ बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी

वाघवडे गावातील नागरिकांनी गावाजवळ असलेल्या मुंगेत्री नदीच्या पुलाजवळ सकाळपासूनच गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. श्रीमूर्तींचे अगदी भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. संतिबस्तवाड येथील नागरिकांनी गावाजवळ असलेल्या विहिरी तसेच मुंगेत्री नदीमध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन केले.

मंडोळीतील तलावात गणपती मूर्तींचे विसर्जन 

मंडोळी गावाजवळ असलेल्या निसर्गरम्य अशा तलावात गावातील गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले या तलावाच्या काठावर भक्तांची गर्दी झाली होती. सावगाव येथील तलावात सावगाव, हंगरगा, मंडोळी, बेनकनहळी तसेच  आजूबाजूच्या सार्वजनिक गणपती मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले.

सोनोली व येळेबैल, इनाम बडस 

सोनोली व येळेबैल सार्वजनिक व घरगुती श्रीमतींचे विसर्जन गावाजवळ असलेल्या मार्कंडेय नदीच्या पुलाजवळील नदीत करण्यात आले. राकसकोप गावातही जल्लोषात श्रींची मिरवणूक काढण्यात आली. इनाम बडस येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक निघाली.

हलगा, बस्तवाड व कोंडुसकोप

हलगा, बस्तवाड व कोंडुसकोप या तीन गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्तींचे विसर्जन हलगा येथील तलावात करण्यात आले. या भागात सकाळी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

बस्तवाड

बस्तवाड गावातील नागरिकांनी आपल्या गावाजवळ असलेल्या तलावात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने महाआरती करून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला सुऊवात केली.

हलगा येथे टॅफिक जाम

हलगा, बस्तवाड,कोंडुसकोप गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्तींची मिरवणूक आल्यामुळे हलगा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले होते. रणकुंडये गावातील घरगुती श्रीमूर्तींचे विसर्जन गावाजवळ नदीमध्ये करण्यात आले. एक गाव एक गणपती परंपरा जपलेल्या बाळगमट्टी गावात विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.

पिरनवाडी 

पिरनवाडी गावातील नागरिकांनी गावाजवळ असलेल्या तलावात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले तसेच काही नागरिकांनी खादरवाडी तलावात जाऊनही श्रीमूर्तींचे विसर्जन केले. पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मंडळाची व पाटील गल्ली व रयत गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची दोन्ही मंडळांच्या श्रीमूर्ती कपिलेश्वर तलाव येथे विसर्जित करण्यात आल्या. मच्छेत शांततेत मिरवणूक काढण्यात आली. खादरवाडीतील नागरिकांनी तलावात घरगुती गणपतींचे विसर्जन केले. कावळेवाडी, बिजगर्णीत टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण भागात वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकंदरीत अगदी शांततेत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

येळ्ळूरमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप

येळ्ळूर : गणपती बाप्पा मोरय्या पुढच्यावर्षी लवकर या च्या गजरात येळ्ळूरमधील घरगुती व सार्वजनिक गणेशांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक तब्ब्बल पंधरा तास चालली. गणपती विसर्जनचा पहिला मान नेताजी गल्लीचा विघ्नेश्वर दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता विसर्जित झाला.

मिरवणुकीत लेझीम खेळ ठरला लक्षणीय

मरगाई गल्ली हलगा येथील शिवनेरी चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने लेझीमचे पथक सादर केले. या लेझीम पथकामध्ये तरुण व तरुणींचा लक्षणीय सहभाग होता. हा लेझीमचा खेळ पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या लेझीमच्या माध्यमातून या तऊण व तऊणींनी डॉल्बीला फाटा देणारा व पर्यावरणपूरक असा सामाजिक संदेश दिला. तसेच लेझीम खेळाने सर्वांचे आकर्षण ठरले.

Advertisement
Tags :

.