तालुक्यात जड अंत:करणाने बाप्पाला निरोप
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष : मिरवणुकीत टाळ- मृदंग, ढोल-ताशाचा गजर
टाळ मृदंग, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष करत शनिवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी तालुक्यात लाडक्या बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. गणेशोत्सवाच्या प्रारंभापासूनच यावर्षी पाऊस सुरूच होता. मात्र अनंत चतुर्थीच्या दिवशी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात काढण्यात आल्या.
धामणे, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगे(ये.) येथे बाप्पांचे विसर्जन
ग्रामीण भागातील धामणे, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगे(ये), बस्तवाड (हा) येथील गणेशभक्तांनी शनिवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात जड अंत:करणाने निरोप दिला. दुपारी तीननंतर धामणे, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगे(ये), बस्तवाड (हा) भागातील गणेशभक्तांनी घरातील गणपती विसर्जनासाठी घेऊन जाण्यास सुरुवात केली. फटाक्यांच्या आतषबाजीत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घेऊन जात होते. सार्वजनिक मंडळांचे गणपती अवचारहट्टी धरणात तर काही मंडळे जुने बेळगाव तर काही मंडळे तलावाशेजारील विहिरीत विसर्जन केले. देसूर येथील घरगुती गणपती तलावात भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. नंदिहळ्ळी येथील भाविकांनी घरगुती गणपती मोठ्या भक्तीभावाने विसर्जन केले. बस्तवाड (हा.) येथील बनकुडी तलावात बाप्पांचे विसर्जन केले.
येळ्ळूर येथे घरगुती गणपतींना निरोप
गणपती बाप्पा मोरय्या पुढच्यावर्षी लवकर या..च्या गजरात येळ्ळूर येथील घरगुती गणपतींना मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासूनच विसर्जनाची लगबग सुरू होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गौराईच्या गाण्यांच्या तालावर विसर्जन शांततेत सुरू होते. गल्लीगल्लीतीतल घरगुती गणपती ट्रॅक्टरमध्ये ठेवून सामूहिक विसर्जन सुरू होते. लक्ष्मी तलाव व आरवाळी धरणावर विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वडगाव आनंदनगर भागातील विसर्जनही आरवाळी धरण व लक्ष्मी तलावात केले जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. रात्री 8 पर्यंत शांततेत विसर्जन पार पडले.