For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूर गगन की छाँव मे...

06:21 AM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
दूर गगन की छाँव मे
Advertisement

पंछी बनूँ उडती फिरूँ मस्त गगन मे

Advertisement

आज मैं आजाद हू दुनिया के चमन में

हसरत जयपुरी यांचे हे शब्द नर्गिस दत्तवर चित्रित करण्यात आलेलं एक सदाबहार गाणं आहे. कित्येक वेळेला अतिश्रीमंत घरातल्या मुलांना आपण सोन्याच्या पिंजऱ्यात वावरतो असंही वाटतं. सर्वसामान्य लोकांसारखं आयुष्य जगणं कसं असेल हे प्रश्न त्यांच्या डोक्यात सतत फिरत असतात. याउलट सर्वसामान्य माणसाला त्या अतिश्रीमंत जीवनशैलीचं आकर्षण असतं. थोडक्यात माणसाला जे मिळत नाही ते त्याला हवंसं वाटतं. हे त्यामागचं तत्त्व असावं. पण अतिशय श्रीमंत जीवन जगणाऱ्या या मुलीला आपल्या त्या काचबंद आयुष्यातून बाहेर पडायला मिळतं. आणि त्यानंतरचे तिचे ते उत्स्फूर्त उद्गार म्हणजे हे गाणं आहे. माणसाला पंख असावेत हे त्याचं कायमचं स्वप्न होतं. आपल्याकडे शिवकर बापूजी तळपदे यांनी मुंबई चौपाटीवर पहिलं विमान उडवून दाखवलं आणि ते स्वप्न साकार होण्याच्या दिशेने पाऊल पडलं. परंतु त्यांच्या वाटणीला आली ती उपेक्षा. त्यानंतर राइट बंधूंनी विमानाचा जो शोध लावलेला होता तो पुढे पुढे प्रगत होत गेला आणि आकाशात विहार करण्याचं हे माणसाचं स्वप्न विमान नावाच्या पक्षाच्या पोटात बसून साकार झालं.

Advertisement

आजघडीला लाखो उ•ाणं जगभर चालू असतात. आणि ह्या मोठमोठ्या हवाई पक्ष्यांच्या पोटात शेकडो माणसं बसून एकाच वेळेला लांब लांब पल्ल्याचे प्रवासही करत असतात. जसं की न्यूयॉर्कपासून ऑस्ट्रेलियापर्यंत किंवा रशियातून दक्षिण अमेरिकेत, दुबईपासून अर्जेंटिनात, असे कुठल्या कुठल्या प्रवास या माणसांचे सुरू असतात. अर्थात तीही बरीचशी अतिश्रीमंत जीवनशैली म्हणावी अशीच आहे. त्यामुळे त्याचं वाटणारं आकर्षण हे सर्वसामान्यांच्या आयुष्याचा आजही अविभाज्य भाग आहेच. पण एकूण उडणं हीच गोष्ट माणसाला अप्राप्य वाटत असल्यामुळे हे आकर्षण त्याला सोडत नसतं. आपली जमीन सुटणे याचा जितका आनंद असतो तेवढीच भीतीही असते. पण विहंगावलोकन करताना मिळणारा आनंद जो असतो त्यापुढे ही भीती थिटी पडते.

झी क्यू नावाचं एक अत्यंत सुंदर चॅनल काही वर्षांपूर्वी सुरू होतं. माझ्या माहितीप्रमाणे ते सध्या सुरू नाही. त्या झी क्यू वर कितीतरी कार्टून्स लागत असत. आणि ती इतकी सुंदर कार्टून्स होती की आजतागायत इतक्या सुंदर कथावस्तू, पात्ररचना, अप्रतिम उत्कृष्ट अॅनिमेशन असलेली कार्टून्स मी कुठेही बघितलेली नाहीत. पण या निमित्ताने ती आठवायचं कारण असं आहे, की त्याच्यामध्ये डायनासोर ट्रेन नावाचं एक कार्टून होतं. त्या डायनासोर ट्रेनमध्ये डायनासोर विषयीची सगळी माहिती कार्टून आणि कथांच्या स्वरूपात मिळायची. त्यामध्ये डायनासोर कुटुंब दाखवलंय. त्या कुटुंबात चार मुलं असतात आणि एक मूल त्यांनी दत्तक घेतलेलं असतं. ते दत्तक मुल म्हणजे टी रेक्स असतं. टी रेक्स म्हणजेच टेरानोसोर आणि बाकीचे डायनासोर पिल्लं. ही उडणारी असतात मग ती विचार करतात की आपण असे उडू शकतो पण आपल्या या भावाला तर पंखच नाही मग तो कसा उडणार पण ती मुलं हुशार असतात ती त्याला आपल्या पंजात धरून आपल्यासोबत आकाशात उडायला नेतात. आणि त्याला पंख नसल्याची खंत वाटू नये याची पूर्ण काळजी घेतात. एक फार मोठं मूल्य या कार्टूनच्या निमित्ताने शिकवलं जायचं. पोटाशी धरून जेव्हा ती पिल्लं उडायची तेव्हा हवेत विहार करतानाचे त्यांचे जे डोळे असायचे ती नजर मी अजून विसरलेली नाही.

चॉंदतारोंको छूने की आशा आसमानों में उडने की आशा

अगदी केरळ मधल्या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या एका निरागस मुलीलाही असते. प्रत्यक्षात आकाशातून उडून काश्मीरमध्ये फिरायला गेल्यानंतर तिला आणि तिच्या नवऱ्याला जे काही भयंकर वास्तव भोगावं लागतं आणि त्यातून सुदैवाने ती बाहेर पडू शकतात. अशी कहाणी म्हणजे रोजा. सिनेमाच्या जगात इतका सुंदर पिक्चर झाला नाही आणि होणार नाही असं आजही म्हटलं जातं, असा हा रोजा! उडण्याच्या स्वप्नामागची वास्तवाची दाहकता म्हणजे रोजा! बाकी पिक्चरमध्ये गेली पन्नास वर्षापेक्षा जास्ती सिनेमाचे नायक हे अगदी कंपल्सरी असल्यासारखं विमानातून उतरून डायरेक्ट एन्ट्री घेतात. कित्येक जुन्या जुन्या क्लासिक पिक्चर मधून हा नायक परदेशी शिकायला गेलेला असतो. मग त्याला घ्यायला एअरपोर्टवर त्याचे आईबाप आलेले असतात किंवा त्याची होणारी ती आलेली असते. किंवा एअरपोर्टवर अनोळखी मुलीशी ओळख होऊन शेवटी तिचं रूपांतर प्रेमात होतं किंवा तो एका दिशेने येतो ती दुसऱ्या दिशेने दुसऱ्या विमानातून येते, असंही घडतं.

सारांश काय तर हिंदी पिक्चरमधली प्रेमकहानी एअरपोर्टवर सुरू होते आणि बऱ्याचशा कहाण्या एअरपोर्टवर संपतातही. एअरपोर्टचा, पर्यायाने विमानांचा हा असा उडता रोल सिनेमात असणे हे मस्तच होतं आणि अजूनही आहे. खरं तर आता फक्त त्याच्यापाठी असलेली अपेक्षा बदललेली आहे. पण आता घोड्यावरून बसून घोडा उडवत येणाऱ्या राजकुमार आणि राजकुमारीपेक्षाही विमानाचे पंख उडवत येणारा राजकुमार हा जास्ती आकर्षक वाटतो हे नक्की.

आजकल पॉंव जमींपर नहीं पडते मेरे

बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुए

रेखा आणि विनोद मेहरा या जोडीवर चित्रित झालेले हे गाणं आहे. त्या आनंदाने आपले पाय जमिनीवर सुटले आहेत. आपले पाय जमिनीवर पडतच नाहीत आपण आकाशातच मुक्त उडतो आहोत असं तिला वाटत असतं. तिचा प्रेमी तिच्यासोबत असतो. तो तिचा पती आहे. त्याच्यासोबत अत्यंत सुखाचं आनंदाचं आयुष्य ती व्यतीत करते आहे. तिच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा कालखंड चालू आहे. आणि पुढे येतं ते भयानक वास्तव! त्या वास्तवानंतर तिचं आयुष्य, तिचं वैवाहिक नातं, समाजातलं तिचं स्थान, त्या कुटुंबाची झालेली अवस्था हे बघवणार नाही. ‘घर’ नावाच्या सिनेमातले हे गाणं. हा अतिशय वाईट संदर्भ आठवण्याचं कारण एवढंच आहे की नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान अपघातानंतर कित्येकांचं आयुष्य जळून खाक झालं. जी माणसं मृत पावली ती तर बिचारी निघूनच गेली परंतु पाठी राहिलेल्या त्यांच्या नातलगांच्या आयुष्यात कहर आलेला आहे.

तब्बल अडीचशेपेक्षा जास्त माणसं या अपघातामध्ये काळाच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. ड्रीमलाईनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानाच्या सर्वोत्कृष्ट सीरीजमधलं हे एअरक्राफ्ट इतके दुर्दैवी अपघातग्रस्त होईल अशी कोणी कल्पनाही केली नसेल. या निमित्ताने एकूणच वाहतूकव्यवस्थेबाबत माणसांच्या विश्वासाला धक्का बसल्यासारखा झाला आहे. त्याहून अत्यंत दुर्दैवाची घटना अशी, की त्या विमानामध्ये आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास करणारे खूप लोक होते. त्यांच्यासाठी हा विमान प्रवास शेवटचा ठरलेला आहे. ज्या वेळेला अशा अतिशय भयानक घटना घडतात त्यावेळेला स्वप्न पाहण्यावरचाच माणसाचा विश्वास कमी कमी होत जातो.

या घटनेनंतर कित्येक बुकिंग रद्द झालेली आहेत. कित्येक लोकांनी विमानाने प्रवास सध्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित या घटनेचा फोबिया येऊन कित्येक जण विमान प्रवासच टाळतील की काय असाही प्रश्न पडतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की उडण्याचं स्वप्न हे काही काळासाठी बाजूला ठेवलेलं असलं तरी ते कायमचं बाजूला ठेवणे हे मनुष्य स्वभावात बसणार नाही. जे सुदूर, जे असाध्य, तेथे मन धावे ही नैसर्गिक प्रवृत्ती असल्यामुळे विमानांची उ•ाणं ही त्या दिवशीही चालूच होती, आजही चालूच आहेत यापुढेही चालूच राहणार आहेत कारण आशा कधी संपत नाही. दूर गगन की छाँव मे विहरत जाणारी ही विमानं तशीच विहरत राहणार आहेत. आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे. अपघातात दगावलेल्या दुर्दैवी जिवांबद्दल अत्यंत वाईट वाटतं. त्या जिवांना श्रद्धांजली! आणि या घटनेची योग्य चौकशी होण्याची नक्कीच गरज आहे. आणि संबंधित विभाग आणि सरकार त्यांचं काम करणार आहेतच. परंतु या घटनेची भीती घेऊन लोकांनी आपली उडण्याची स्वप्नं मात्र विसरू नयेत असं आवश्य वाटतं.

 -अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.