प्रसिद्ध गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
गझल गायक पंकज उधास यांनी आज 26 फेब्रुवारी रोजी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुप्रसिध्द कलकाराच्या निधनाचे वृत्त उधास यांच्य़ा कुटुंबाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे दुजोरा मिळाला. गेले काही दिवसांपासून ते दिर्घ आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये उपचार चालू होते. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पंकज उधास यांची मुलगी नायब उधास हिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये माहीती देताना म्हटले आहे की, "अत्यंत जड अंत:करणाने, आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले." त्यांच्य़ावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
एक गझल गायक म्हणून उदयास आलेल्या पंकज उधास यांनी चित्रपटांसाठीही सुपरहिट गाणी गायली आहेत. नाम, साजन, मोहरा यासारख्या चित्रपटांमध्ये गायलेल्या गाण्यांनी त्यांना विषेश ओळख दिली. नाम चित्रपटातील त्यांच्या 'चिट्टी आयी है' आणि 'और आहिस्ता किजिए बातें' या गाण्याने त्यांना जगभरात ओळखले जाऊ लागले.