प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर देणार "बीकेसी"ला भेट
अच्युत सावंत -भोसले यांची माहिती ; २० डिसेंबरला संस्थेत दिवसभर कार्यक्रम
सावंतवाडी प्रतिनिधी
प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर हे २० डिसेंबरला सावंतवाडीत येत असून त्यांचे यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. माशेलकर जिल्ह्यात प्रथमच येत आहेत याबाबतची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी दिली.
सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार असून सकाळी साडेदहा ते दुपारी बारा यावेळी माशेलकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. मुलाखत जयु भाटकर घेणार आहेत. दुपारनंतर बीकेसीचे विद्यार्थी तसेच बाहेरील शाळांमधील विद्यार्थी यांच्याशी माशेलकर हितगुज करणार आहेत. यावेळी विद्यार्थी माशेलकर यांना प्रश्न विचारणार आहेत. सायंकाळी जिल्ह्यातील महनीय व्यक्ति ,पत्रकार, शिक्षक ,सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी , यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत. असे भोसले म्हणाले. माशेलकर यांची यापूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना सावंतवाडीत येण्याचे निमंत्रण दिले होते . त्यांनी आपल्याला विद्यार्थ्यांशी हितगुज साधायला आवडेल असे सांगितले होते. त्यानुसार हा उपक्रम होत आहे . संशोधनात्मक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भविष्यात त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. असेही भोसले म्हणाले . यावेळी प्राचार्य . डॉ विजय जगताप ,डॉ. रमण माने , नितीन सांडये उपस्थित होते.