मसुरेतील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील दूखंडे यांचे निधन
मसुरे प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे मागवणे येथील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील सिताराम दूखंडे वय ४४ वर्ष याचे नुकतेच मुंबई येथे आकस्मिक निधन झाले. सुनील याच्या निधनाने मसुरे परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.सुनील दूखंडे याचे सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. सिक्सर किंग म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये त्याची ओळख होती. मसुरे गावातून मागवणे संघाकडून श्री गणेशा करणाऱ्या सुनील याने पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गूड मॉर्निंग मालवण, गजानन गावा, एम एस ए मसुरे, स्टार इलेव्हन मसुरे, एमसीसी मागवणे, संडे स्पोर्ट्स मुंबई,पनवेल संघ, बंड्या इलेव्हन मसुरे, देवबाग संघ, देवगड, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी अशा नामवंत संघामध्ये सुनील याची निवड झाली होती. तसेच महाराष्ट्र बाहेरील गोवा येथील अनेक नामवंत संघामध्ये सुनील याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. मसुरे येथे सामाजिक, कला, क्रीडा तसेच धार्मिक क्षेत्रातही त्याचा मोठा वाटा होता. अनेक युवा क्रिकेटपटू घडविण्यातही सुनील याचे योगदान मोठे होते. आपल्या शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे सर्वांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. वेळप्रसंगी सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा त्याचा गुणधर्म होता.त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, वडील, दोन बहिणी,काका,काकी, भावोजी सासू-सासरे,चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. मसुरे येतील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश वंजारे यांचे तो मेहुणा, मागवणे येथील आशा स्वयंसेविका मीना वंजारे याचा तो भाऊ तर मुंबई मालाड येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सुरेश मापारी यांचा तो मामेभाऊ, मागवणे नूतन पोलीस पाटील अभी दूखंडे यांचा तो चुलत भाऊ होता.